भाईंदर प्रतिनिधी
मीरा-भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढणारी पाणीटंचाई आणि पाणीचोरी रोखण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका आता पूर्णपणे अॅक्शन मोडवर आली आहे. शहरातील विविध भागांत बेकायदेशीररीत्या मोटार किंवा पंप लावून पाण्याचा उपसा करणाऱ्यांवर महापालिकेने कडक पावले उचलली असून, अशा पाणीचोरांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अनधिकृतपणे पाणी उपसा करताना आढळल्यास नळ कनेक्शन तातडीने कापण्यात येणार असून ५० हजार रुपयांचा दंडही आकारण्यात येणार आहे.
मीरा-भाईंदर शहराला विविध जलकुंभांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक भागांत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील पाण्याचा साठा पूर्ण भरल्यानंतरही नळ चालूच ठेवणे, पिण्याच्या पाण्याचा वापर करून दुचाकी व चारचाकी वाहने धुणे अशा प्रकारांमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. याशिवाय, मुख्य जलवाहिनीवरून (मेन लाईन) बेकायदेशीर कनेक्शन घेऊन पाण्याचा अवैध उपसा केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या गंभीर प्रकारची दखल घेत पालिका प्रशासनाने पाणीमाफियांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
विशेष पथकाची नेमणूक आणि कडक निर्बंध
या अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. हे पथक शहरातील विविध भागांत अचानक पाहणी करून अनधिकृत मोटार किंवा पंप बसवलेल्या नळजोडण्यांचा शोध घेणार आहे. तपासणीदरम्यान कोणत्याही नळजोडणीवर अनधिकृत पंप किंवा मोटार आढळल्यास, ती जागेवरच जप्त केली जाईल. तसेच, संबंधितांवर ५० हजार रुपयांचा दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून, संबंधित मालमत्तेचा नळजोडणी सुद्धा खंडित केली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. या धडक कारवाईमुळे शहरात पाणीचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

