स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबईतील अत्यंत पॉश मानल्या जाणाऱ्या जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका रहिवासी इमारतीमधील व्यावसायिकाच्या कुटुंबाला लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या मारेकऱ्यांनी इमारतीच्या सुरक्षारक्षकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिला. विशेष म्हणजे, ज्या घरात नोकर म्हणून काम करत होता, त्याच व्यक्तीने हा भयानक कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, जुहू पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य सूत्रधारासह एकूण ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे नेमकी घटना?
जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२:४० ते पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान जुहू परिसरातील एका इमारतीत ही घटना घडली. संबंधित व्यावसायिकाला लुटण्याच्या इराद्याने काही इसम इमारतीत आले होते. यावेळी इमारतीचा सुरक्षा रक्षक मनोजकुमार अयोध्या यादव (वय ३८) याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या नराधमांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली आणि कापडी रस्सीने गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत फेकून देण्यात आला.
सदर गंभीर गुन्हा उघडकीस येताच पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ-२ यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि विविध पथके तयार केली.
दोन वर्षांपासून रचला जात होता कट!
तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, संबंधित व्यापारी कुटुंबाकडे स्वयंपाकी (कूक) म्हणून काम करणारा नोकर आणि त्याचा मित्र या गुन्ह्यात सामील असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत स्वयंपाकी जोगेश्वर उदन मल्लिक उर्फ किशन आणि त्याचा साथीदार विजय गोंजारी यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, जोगेश्वर मल्लिक याने फ्लॅटची बनावट चावी तयार करून आपण ज्या व्यापाऱ्याकडे काम करतो, त्यांच्या घरी दरोडा टाकण्याचा प्लॅन आखल्याची धक्कादायक माहिती दिली. व्यापारी, त्यांची पत्नी आणि मुलगी यांची हत्या करून घरातील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा हा कट मागील तब्बल दोन वर्षांपासून रचला जात होता, हे उघडकीस आल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
मुख्य सूत्रधार जोगेश्वर मल्लिक याने हा कट अमलात आणण्यासाठी विजय गोंजारेच्या मदतीने आणखी तीन साथीदार – शरद येरूडकर (वय ४१), महादेव येरूडकर (वय ३५) आणि अनिकेत बोरनाक (वय ३०) यांना सामील करून घेतले होते.
अशी रचली खूनी खेळी आणि सुटले हात:
तपासात पुढे आले की, मुख्य सूत्रधार जोगेश्वर मल्लिक याने यापूर्वीच आपल्या सर्व साथीदारांची ओळख मयत सुरक्षा रक्षक मनोजकुमार यादव याच्यासोबत करून दिली होती. १ आणि २ ऑगस्टच्या मधोमध रात्री सर्व आरोपी इमारतीजवळ एकत्र जमले आणि त्यांनी सुरक्षा रक्षक मनोजकुमार यादव याच्यासोबत खाली बसून दारू प्राशन केली. त्यानंतर पूर्वनियोजित कटानुसार त्यांनी सुरक्षा रक्षकाचा गळा आवळून आणि हात बांधून त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ढकलून दिला.
या कृत्यनंतर पहाटे ४:०० वाजण्याच्या सुमारास सर्व आरोपी इमारतीच्या ६ व्या मजल्यावर पोहोचले. फ्लॅटची बनावट चावी वापरून दरवाजा उघडण्याचा आणि घरात प्रवेश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु दरवाजा उघडण्यात त्यांना अपयश आले. अखेर बरीच धडपड करूनही यश न मिळाल्याने आरोपींनी तिथून काढता पाय घेतला. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या पोलीस अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे उघड झाला गुन्हा:
हा संपूर्ण अंधारातील आणि गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) अभिनव देशमुख आणि पोलीस उप आयुक्त (पश्चिम, परिमंडळ २) मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
या तपास पथकामध्ये सहायक पोलीस आयुक्त विनोद गावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूराव गावडे, पोलीस निरीक्षक अतुल माळी, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक रणजित चव्हाण, पोलीस उपनिरीक्ष बाळासाहेब पोटे, सहायक पोलीस निरीक्षक यश पालवे, सहायक पोलीस निरीक्षक हनमंत कुंभार आणि पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत ओमासे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

