हरियाणा
सोनीपत (हरियाणा) : आपल्या मुलींना शिकवून मोठे करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या एका वडिलांच्या आयुष्याचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायी ठरला. गंभीर आजाराने त्रस्त असताना अखेरच्या क्षणी मुलींना भेटण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहिली. निधनानंतरही तिन्ही मुलींनी अंत्यदर्शनासाठी येण्यास नकार दिल्याने या घटनेने नात्यांमधील वाढत्या दुराव्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शिवचरण रतन गुप्ता हे मूळचे मुंबईतील कापड व्यावसायिक होते. व्यवसायात नुकसान झाल्यानंतर ते हरियाणातील सोनीपत येथे स्थायिक झाले. पत्नीच्या निधनानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांनी तेथील एका वृद्धाश्रमात आश्रय घेतला होता. त्यांना मुलगा नसून तीन मुली आहेत. मुलींना उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली.
गेल्या काही दिवसांपासून गुप्ता यांची प्रकृती खालावत होती. वृद्धाश्रमाचे संचालक आनंद यांनी त्यांच्या तिन्ही मुलींना वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देत तातडीने येण्याची विनंती केली होती. मात्र, कामाची आणि वेळेची अडचण सांगत तिन्ही मुलींनी येणे टाळल्याचे सांगितले जाते.
अखेर उपचारादरम्यान गुप्ता यांचे वृद्धाश्रमात निधन झाले. त्यानंतरही प्रशासनाने मुलींना संपर्क करून पार्थिव ठेवून देण्याची तयारी दर्शवली. मात्र, कोणतीही मुलगी अंत्यदर्शनासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी आली नाही.
याउलट, ‘५१०० रुपये पाठवते, अंत्यसंस्कार करून घ्या,’ असा संदेश देत अंत्यविधीची जबाबदारी वृद्धाश्रम प्रशासनावरच सोपवण्यात आल्याचे समोर आले आहे. वडिलांचे अंत्यसंस्कार मुलींनी व्हिडिओ कॉलद्वारे पाहिल्याची माहितीही वृद्धाश्रम प्रशासनाने दिली. इतकेच नव्हे, तर अस्थी घेण्यासाठीही त्या आल्या नाहीत. गंगेत अस्थी विसर्जन करण्याची विनंती त्यांनी वृद्धाश्रमाच्या संचालकांकडे केली असून अंत्यसंस्काराचा संपूर्ण व्हिडिओ पाठवण्यासही सांगितल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, गुप्ता यांची मोठी मुलगी अनिता नेपाळमध्ये शिक्षिका आहे. दुसरी मुलगी निशा उत्तर प्रदेशातील आजमगढ येथे राहते, तर धाकटी मुलगी प्रिया मुंबईत वास्तव्यास आहे.
या घटनेनंतर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. मुलांच्या भविष्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या आई-वडिलांना अखेरच्या क्षणीही आपल्या लेकरांचे दर्शन मिळू नये, ही समाजासाठी चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलती जीवनशैली आणि नात्यांमधील कमी होत चाललेला जिव्हाळा या घटनेतून स्पष्ट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

