मुंबई प्रतिनिधी
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने तिरंगा फडकवावा आणि त्यासोबतचा सेल्फी अधिकृत संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवर अपलोड करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सुरू झालेल्या या अभियानाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यंदाही मोठ्या प्रमाणावर जनसहभाग अपेक्षित आहे. राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर, देशप्रेम आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज फडकवावा. त्यानंतर ध्वजासोबत सेल्फी काढून harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत मोबाईल ॲपवर अपलोड करावा. सेल्फी अपलोड करताना #SelfieWithTiranga हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अपलोड केलेल्या छायाचित्रावर ‘वंदे मातरम्’चा विशेष लोगोही दिसणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना तसेच नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. विविध शाळा, महाविद्यालये, संस्था आणि सामाजिक संघटनांमार्फत जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेऱ्या, तिरंगा रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याची आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरात पोहोचविण्याची ही संधी असल्याचे शासनाने नमूद केले आहे. प्रत्येक भारतीयाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे आणि स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अभिमानाने साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


