मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर अखेर वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर मार्च महिन्यापासून रिक्त असलेल्या या पदाची धुरा नागवडे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षात अनेक इच्छुक महिला नेत्यांमध्ये चुरस होती. विविध स्तरांवर लॉबिंग सुरू असतानाच अखेर वैशाली नागवडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या महिला संघटनेला नवे नेतृत्व मिळाले आहे.
अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दोन्ही पदे रिक्त होती. आता महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नागवडे यांच्याकडे देण्यात आली आहे.
वैशाली नागवडे या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील असून सध्या त्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पक्षातील आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.
नागवडे यांच्या राजकीय प्रवासाला १९९९ मध्ये सुरुवात झाली. त्यानंतर २००२ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. २००५ मध्ये महानंदाच्या संचालिका, २००७ मध्ये पंचायत समिती दौंडच्या सदस्य, २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र पंचायत राज महिला समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. २०१० मध्ये पुन्हा महानंदाच्या संचालकपदी निवड झाली, तर २०१३ मध्ये त्या महानंदाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. याच वर्षी उत्तर प्रदेशातील आयव्हीआरआय (IVRI) संस्थेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती झाली.
२०१७ आणि २०२० मध्ये त्यांनी राहू-खामगाव मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. पक्षातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळतानाच त्यांनी अनेकदा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेला विरोध दर्शविल्याने त्या चर्चेतही राहिल्या होत्या. आता महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे सोपविल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेत नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे.


