शहापूर प्रतिनिधी
राज्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि मृत्यूंची मालिका थांबण्याचे नाव घेत नसतानाच ठाणे अग्निशमन दलाच्या TDRF (Thane Disaster Response Force) मधील एका जवानाचा जीव मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यामुळे गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर मृत जवानाच्या कुटुंबीयांनी संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असताना, शहापूर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली आणि “तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?” असा सवाल केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत निष्पक्ष चौकशीचे आश्वासन दिले आहे.
मृत जवान विकास लहू गोरे हे ठाणे अग्निशमन दलाच्या TDRF पथकात कार्यरत होते. आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारा हा जवान सोमवारी कामावर जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील गोठेघर परिसरात पाण्याखाली दडलेल्या मोठ्या खड्ड्यात त्यांची बुलेट दुचाकी आदळली. नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“जीव वाचवणारा जवान खड्ड्यामुळे गेला”
विकास गोरे यांनी आपल्या सेवाकाळात अनेक दुर्घटनांमध्ये जीव धोक्यात घालून नागरिकांना मदत केली होती. भिवंडीतील इमारत दुर्घटना, पूरस्थिती आणि विविध आपत्कालीन घटनांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. विडंबना म्हणजे इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा मृत्यू मात्र रस्त्यावरील खड्ड्यामुळे झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांकडून धक्कादायक वागणूक?
दुर्घटनेनंतर संतप्त कुटुंबीयांनी संबंधित महामार्गाच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शहापूर पोलीस ठाणे गाठले. मात्र, तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी उलट मृत जवानालाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मृत जवानाचे काका म्हणाले, “आम्ही पोलीस ठाण्यात गेलो असता पीआय कदम म्हणाले की, ‘मुलाचीच चूक असेल, त्याला खड्डा दिसला नसेल.’ आम्ही ठेकेदारावर कारवाईची मागणी करत होतो. त्या दिवशी मुसळधार पाऊस होता. खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. अशा परिस्थितीत तो दिसणार तरी कसा? आमचा मुलगा लोकांचे जीव वाचवण्यासाठी धावत होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे.”
कुटुंबीयांनी एवढ्यावरच न थांबता, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याऐवजी मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा पोलिसांकडून करण्यात आल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
पोलीस निरीक्षकांचा आरोप फेटाळला
दरम्यान, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी कुटुंबीयांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
त्यांनी सांगितले की, “३ ऑगस्ट रोजी गोठेघर येथे झालेल्या अपघातानंतर मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे. मृताच्या भावाची तक्रार स्वीकारण्यात आली असून तपास सुरू आहे. संबंधित खड्डा तातडीने बुजवण्यात आला आहे. नातेवाईकांनी केलेले आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत. तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.”
DYSP यांचे चौकशीचे आश्वासन
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नागरगोजे यांनी नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यांनी सांगितले की, “मृत जवानाच्या नातेवाईकांनी पोलिसांविरोधात केलेल्या आरोपांची योग्य ती चौकशी केली जाईल. चौकशी अहवालानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.”
खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी जबाबदार कोण?
दरवर्षी पावसाळ्यात राज्यभरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शेकडो अपघात होतात. अनेकांना जीव गमवावा लागतो, तर अनेकजण कायमचे अपंग होतात. तरीही संबंधित ठेकेदार, अभियंते किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याची उदाहरणे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो.
विकास गोरे यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा महामार्गांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात खड्ड्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणा आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित होणार का, कुटुंबीयांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणार का आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.


