शहापूर प्रतिनिधी
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला असून महामार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. शहापूर येथील भारंगी नदी पुलावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात टीडीआरएफचे जवान विकास गोरे यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने संबंधित खड्डा बुजवला. मात्र, महामार्गावरील इतर धोकादायक खड्ड्यांकडे अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी आणि वाहनचालकांमध्ये संतापाची लाट आहे.
पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी भारंगी नदी पुलावरील खड्ड्यात दुचाकीचा अपघात होऊन टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर मदतकार्यावरून परतत असताना हा अपघात घडला होता. या घटनेनंतर प्रशासनाने संबंधित खड्डा तातडीने बुजवला.
मात्र, या ठिकाणापासून अवघ्या दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरील आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ महामार्गावर आजही मोठमोठे खड्डे कायम आहेत. काही खड्डे दीड ते दोन फूट खोल तर सुमारे सहा फूट रुंद असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे भरधाव वाहनांचे संतुलन बिघडून अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून चालकांना रस्त्याच्या कडेला थांबून वाहनांची पाहणी करण्याची वेळ येत आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या वाहनचालकांनी आणि स्थानिक संघटनांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “टोल भरल्यानंतरही सुरक्षित रस्ता मिळत नसेल, तर टोलचा उपयोग काय?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
एक-दोन खड्डे बुजवून हा प्रश्न सुटणार नसून संपूर्ण मुंबई-नाशिक महामार्गाची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


