पुणे प्रतिनिधी
लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रवादी विचारांचा गौरव करणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात यंदा भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या या प्रतिष्ठेच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
LIVE | मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 चे वितरण
🕐 दु. १ वा. | १-८-२०२६📍पुणे.@AmitShah#Maharashtra #Pune #LokmanyaTilak https://t.co/3xCX6Nobg9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2026
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, पुरस्कार सोहळ्याइतकाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषणही चर्चेचा विषय ठरले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव करताना अमित शहा यांच्यावरही स्तुतिसुमने उधळली. “एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत,” असे म्हणत त्यांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
फडणवीस म्हणाले, “आजचा दिवस प्रत्येक देशभक्तासाठी अभिमानाचा आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक मानला जातो. राष्ट्रहितासाठी असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा सन्मान राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा देणारे अजित डोवाल यांना मिळत आहे. आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्त्व अमित शहा उपस्थित आहेत. त्यामुळे हा सोहळा अधिकच ऐतिहासिक ठरला आहे.”
भाषणादरम्यान फडणवीस यांनी अमित शहा यांचा उल्लेख “राजकारणातील चाणक्य” असा केला. ते म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात अजित डोवाल यांना आधुनिक चाणक्य म्हणून ओळखले जाते, तर राजकारणात रणनीती, नियोजन आणि निर्णयक्षमतेमुळे अमित शहा यांना चाणक्य मानले जाते. अशा दोन प्रभावी व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणे ही मोठी बाब आहे.”
अजित डोवाल यांच्या कार्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ नंतर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल झाले. दहशतवादाविरोधातील धोरण अधिक आक्रमक झाले, सीमासुरक्षेला बळकटी मिळाली आणि भारताने जगासमोर ठाम भूमिका मांडण्यास सुरुवात केली. “पूर्वी भारतावर हल्ले झाले की आपण केवळ निषेध नोंदवत असू. मात्र आजचा भारत मार खाणारा नाही, तर गरज पडल्यास घरात घुसून प्रत्युत्तर देणारा देश म्हणून जगासमोर उभा आहे. या बदलामागे अजित डोवाल यांच्यासारख्या रणनीतीकारांचे मोठे योगदान आहे,” असे ते म्हणाले.
लोकमान्य टिळकांच्या विचारांचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “टिळक हे भारताच्या राष्ट्रवादाचे जनक होते. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ ही घोषणा देऊन त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा दिली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणत राष्ट्रभावना जागवण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, त्याग आणि देशहित या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीलाच त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळायला हवा आणि तो यंदा अजित डोवाल यांना मिळणे हा अभिमानाचा क्षण आहे.”
आपल्या भाषणाच्या शेवटी फडणवीस यांनी अजित डोवाल यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. “देशसेवेसाठी त्यांना शंभरीपर्यंत कार्य करण्याची शक्ती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. राष्ट्रहितासाठी आयुष्य वाहिलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठीही अभिमानाची बाब आहे,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विशेषतः “एका धुरंधाराला पुरस्कार देण्यासाठी धुरंधर आले” आणि “राजकारणातील चाणक्य” या उल्लेखांवर सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यामुळे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचे भाषणही दिवसातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले.


