पुणे प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात तरुणांचे आंदोलन पेटले असताना आणि त्या आंदोलनावरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वेगळाच संदेश दिला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या गीतारहस्य ग्रंथाचे वाचन करण्याचे आवाहन करत, “टिळकांची गीता वाचा. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधीच चूक करणार नाही. मी याची गॅरंटी देतो,” असे शाह म्हणाले.
पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना त्यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांचा आणि कार्याचा गौरव करत तरुणांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
शाह म्हणाले, “मला लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ गुजराती भाषेत वाचायला मिळाला. हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेचे व्यावहारिक स्वरूप आहे. सामान्य माणूस भगवद्गीतेतील विचार आपल्या दैनंदिन जीवनात कसे उतरवू शकतो, याचे प्रभावी मार्गदर्शन या ग्रंथातून मिळते. त्यामुळे प्रत्येक तरुणाने हा ग्रंथ वाचला पाहिजे.”
‘केसरी’ला इंग्रज घाबरत होते
लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेचाही शाह यांनी विशेष उल्लेख केला. “इंग्रजांना जर कोणत्या वृत्तपत्राची सर्वाधिक भीती वाटत असेल, तर ती केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांची होती. राष्ट्राची चेतना जागविल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही, असा टिळकांचा ठाम विश्वास होता. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उपक्रमांतून त्यांनी समाज संघटित करण्याचे ऐतिहासिक कार्य केले,” असे शाह यांनी सांगितले.
‘डोवाल यांचा सन्मान म्हणजे प्रेरणेचा गौरव’
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल शाह यांनी टिळक स्मारक ट्रस्टचे आभार मानले. “एखाद्या व्यक्तीने राष्ट्र आणि समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणजे समाजाच्या कृतज्ञतेची अभिव्यक्ती असते. अशा व्यक्तींच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते. अजित डोवाल यांना हा पुरस्कार मिळाल्याने देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या आठवड्यात जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलन, त्यावरील लाठीमार आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. मात्र, पुण्यातील भाषणात त्यांनी त्या विषयावर कोणतेही भाष्य न करता लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा आणि गीतारहस्य या ग्रंथाचे महत्त्व यावरच भर दिला.


