मुंबई, प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटीप्रकरणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त आणि लक्षवेधी वक्तव्य केले आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीतील प्रत्येक दगड पोलिसांनी जप्त केला असून, त्यावरील बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट्स) आधार कार्डशी लिंक करून तपास केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिल्ली पोलिसांनी या आंदोलनासंदर्भात अत्यंत सविस्तर आणि धक्कादायक अहवाल तयार केला आहे. तो पाहिल्यानंतर कोणालाही धक्का बसेल. दगडफेकीत वापरण्यात आलेला प्रत्येक दगड पोलिसांनी गोळा केला असून, त्यावरील फिंगरप्रिंटच्या आधारे संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.”
पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आंदोलनाचे विश्लेषण केले असून, अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी आणि आंदोलनामागील हेतूही स्पष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या लाठीचार्जाच्या आरोपांबाबतही पोलिसांच्या अहवालातून सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.
यावेळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी योग्य वेळी कारवाई केल्याचे सांगत, आंदोलक संसद परिसरात घुसले असते तर देशासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, असा दावा त्यांनी केला. या आंदोलनाला परदेशातून मदत मिळत असल्याची तसेच काही समाजकंटक त्यात सहभागी झाल्याची माहिती सरकारकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


