मुंबई : प्रतिनिधी
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालये नाहीत, त्या ठिकाणी नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिक शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांच्या कामकाजाचा त्यांनी मंत्रालयात सविस्तर आढावा घेतला.
मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदे, विविध संस्थांतील सोयी-सुविधा, इमारतींची स्थिती, शासनाकडून मंजूर निधीचा वापर, खर्च, शिल्लक निधी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची सद्यस्थिती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी आणि मूल्यमापन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री भुसे यांनी ज्या जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालये उपलब्ध नाहीत, तेथे ती सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सैनिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी परिसरातील इतर शाळांमध्ये प्राथमिक प्रशिक्षण उपक्रम राबवावेत, शासकीय विद्यानिकेतनांमधील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेल्या सोयी-सुविधांच्या कामांना गती देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विद्यार्थीहित, शैक्षणिक गुणवत्ता आणि संस्थांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे आदेश त्यांनी दिले.
या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित संस्थांचे प्राचार्य आणि कार्यालय प्रमुख उपस्थित होते.


