सातारा प्रतिनिधी न्यूज नेटवर्क
ग्लास्गो : कॉमनवेल्थ गेम्सच्या चौथ्या दिवशी भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची स्टार वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू हिने दमदार कामगिरी करत देशाचे नाव पुन्हा एकदा जगात उंचावले आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने पहिले सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते सुवर्णपदकाने उघडले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून तिने आपली विजयाची हॅट्रीक पूर्ण केली आहे.
Mirabai Chanu has tears in her eyes on the podium🥹
The Indian completes a hat-trick of Commonwealth Games medal in Glasgow🥇🥇🥇#Weightlifting #Glasgow2026 pic.twitter.com/w2FIzhppAA
— The Bridge (@the_bridge_in) July 26, 2026
पहिला प्रयत्न चुकला, पण जिद्दीने मारली बाजी
सामन्याची सुरुवात होताच मीराबाईचा पहिला प्रयत्न चुकला आणि तिने ८२ किलो वजन उचलताना अडचण आली. यामुळे चाहत्यांच्या मनात थोडी धाकधूक वाढली होती. पण एका खऱ्या खेळाडूची ओळख अशाच प्रसंगात होते. मीराबाईने कसलीही न घाबरता जोरदार कमबॅक केले आणि दुसऱ्या प्रयत्नात हे वजन यशस्वीपणे उचलले. एवढेच नाही तर तिने ८५ किलो वजन उचलून थेट राष्ट्रकुल स्पर्धेचा नवीन रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
या ३१ वर्षीय खेळाडूने संपूर्ण सामन्यात कमाल खेळ करत एकूण १९० किलो वजन उचलले आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
भारताची शान वाढवली
राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात आणि इतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कॉमनवेल्थ देशांमधील कोणत्याही खेळाडूने आतापर्यंत उचललेले हे सर्वाधिक वजन आहे. त्यामुळे मीराबाईचा हा विजय भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. याआधी ऋषिकांत सिंगने भारताला रौप्य पदक मिळवून दिले होते आणि आता मीराबाईच्या या सुवर्णपदकाने भारताच्या पदकांमध्ये आणखी मोठी भर पडली आहे.


