सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादानंतर आई आणि १४ वर्षीय मुलीचा रेल्वे रुळावर मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. होटगी रोड परिसरातील आयकर भवनामागील रेल्वे रुळावर रविवारी पहाटे दोघी आढळून आल्या. वर्षा पांडुरंग आधटराव (३३) आणि त्यांची मुलगी स्वरा पांडुरंग आधटराव (१४), अशी मृतांची नावे आहेत. दोघीही सुशील नगर परिसरातील रहिवासी होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री वर्षा यांचा पती पांडुरंग यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास पांडुरंग यांनी पत्नी वर्षा आणि मुलगी स्वराला त्यांच्या मावशीच्या घरी आणून सोडले. त्यानंतर ते स्वतः सैफूल येथील आपल्या घरी परतले.
दरम्यान, काही वेळाने वर्षा आणि स्वरा या दोघी मावशीच्या घरातून बाहेर पडल्या. त्या आसरा ब्रिजच्या दिशेने गेल्यानंतर रेल्वे रुळावरून पुढे निघाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे पोलिसांना रुळावर दोघी आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
विजापूर नाका पोलिसांनी दोघींची ओळख पटवून नातेवाइकांना माहिती दिली. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दोघींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
वर्षा आधटराव या सैफूल परिसरातील पांडुरंग आधटराव यांच्या पत्नी होत्या. पांडुरंग हे डी-मार्टमध्ये कामाला असल्याची माहिती आहे. वर्षा यांच्या आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून, त्या नेहरू नगर परिसरातील डी.एड. कॉलेजजवळील सुशील नगर येथे मावशीकडे येत-जात असत.
या घटनेमुळे आधटराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, वर्षा यांनी मुलीसह टोकाचे पाऊल का उचलले, यामागील नेमके कारण काय, याचा तपास विजापूर नाका पोलिसांकडून सुरू आहे. कौटुंबिक वादातूनच ही घटना घडली का, यासह अन्य शक्यतांचाही पोलीस तपास करीत आहेत.


