मुंबई प्रतिनिधी
मुंबई : भायखळा पोलिस ठाण्यात रविवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीच्या उंच ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरातून दिसत असल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीने आग आटोक्यात आणण्याचे काम हाती घेतले.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे पोलिस ठाण्यातील काही साहित्याचे नुकसान झाल्याची शक्यता असून, नुकसानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
आग लागल्यानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि अग्निशमन दलाने परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवत परिसर सुरक्षित केला. आग लागण्याचे नेमके कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात आग लागण्याच्या घटनांची मालिकाच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कल्याण पश्चिमेतील कोळीवली पेट्रोल पंपाजवळ चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबवून तातडीने उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. काही क्षणांतच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या घटनेतही जीवितहानी झाली नाही.
तसेच, भिवंडी तालुक्यातील वडपे वंजारपट्टी नाका परिसरातील निंबवली फाट्याजवळ किराणा मालाने भरलेल्या टेम्पोला भीषण आग लागली. चालक चहा पिण्यासाठी खाली उतरला असताना टेम्पोने अचानक पेट घेतल्याचे सांगण्यात आले. स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


