नवी दिल्ली वृत्तसंस्था
अखेर ३७ दिवसांच्या संघर्षाला यश आले. जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि आंदोलनाची सांगता झाली. या विजयानंतर देशभरातून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे कौतुक होत असतानाच, आंदोलनाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मात्र एक वेगळीच भावना व्यक्त केली आहे. आंदोलनाच्या यशानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी दीपके यांनी आपल्या समर्थकांची जाहीर माफी मागितली. त्यांच्या या माफीमागचे कारणही त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे.
“इट फील्स रिअली गुड… खरंच खूप छान वाटत आहे. अखेर आज कुठेतरी शांतपणे झोपू शकलो. बेडरूममध्ये उठताना पुढे काय करायचे, आज संध्याकाळपर्यंत काय होईल किंवा काय होणार नाही, याचा विचार करावा लागला नाही. कोणताही पॅनिक नव्हता,” अशा शब्दांत अभिजीत दीपके यांनी ३७ दिवसांच्या आंदोलनानंतरची पहिली सकाळ अनुभवली.
मात्र या समाधानामागे संघर्षाच्या ३७ दिवसांची वेदनाही होती. “गेल्या ३७ दिवसांत जे काही सहन केले, ते खूप कठीण होते. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर माझ्या संपूर्ण टीमसाठीही हा काळ अत्यंत कठीण होता,” असे दीपके यांनी सांगितले.
‘ज्यांनी विश्वास ठेवला, त्यांचे ऋण कधीही विसरणार नाही’
आंदोलनाच्या यशाचे श्रेय त्यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांना दिले. “देशभरातील प्रत्येक समर्थकाचे मी मनापासून आभार मानतो. ज्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या पाठीशी उभे राहिले आणि जेव्हा आमच्यावर संशय घेतला जात होता, तेव्हा आम्हाला प्रेम दिले, त्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले,” असे ते म्हणाले.
मात्र याचवेळी त्यांनी एक महत्त्वाची कबुलीही दिली.
“मी तुमच्या सर्वांची माफी मागतो…”
असे म्हणत अभिजीत दीपके यांनी जंतर-मंतरवर आंदोलनाच्या अखेरच्या दिवशी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची माफी मागितली.
“काल जंतर-मंतरवर थांबलेल्या लोकांना भेटू शकलो नाही. त्यांचे आभारही मानू शकलो नाही. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. मला टायफॉइड झाला आहे आणि तापही जास्त होता. त्यामुळे मला घरी परतावे लागले,” असे त्यांनी स्पष्ट केले.
३७ दिवस रस्त्यावर; विजय मात्र सर्वांचा
जंतर-मंतरवर तब्बल ३७ दिवस आंदोलनात ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांचे दीपके यांनी विशेष कौतुक केले. “३७ दिवस जंतर-मंतरवर राहिलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही या देशासाठी जे केले, त्याची मी खरोखर प्रशंसा करतो. तुमच्याशिवाय हे यश मिळवणे शक्य झाले नसते. तुम्हा सर्वांना माझा सलाम!” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
आंदोलनावर टीका करणाऱ्यांनाही दीपके यांनी लक्ष्य केले नाही. उलट त्यांचेही आभार मानले.
“ज्यांनी आमच्यावर संशय घेतला, प्रश्न उपस्थित केले किंवा आमची टीका केली, त्या सर्वांचेही मी आभार मानतो. कारण तुम्ही प्रश्न विचारले नसते, आमच्यावर टीका केली नसती, तर आम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली नसती,” असे त्यांनी म्हटले.
राजीनामा झाला; पण संघर्ष संपला नाही?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन संपले असले, तरी अभिजीत दीपके यांच्या पुढील विधानाने या आंदोलनानंतरच्या नव्या राजकीय वाटचालीचे संकेत मिळाले आहेत.
“मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे की, ही फक्त एक सुरुवात आहे. कॉकरोच जनता पार्टीला अजून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. आम्ही आणखी पुढे जाऊ. हा केवळ प्रारंभ आहे,” असे दीपके यांनी ठामपणे सांगितले.
त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने आंदोलनाचा एक अध्याय संपला असला, तरी अभिजीत दीपके आणि कॉकरोच जनता पार्टीच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ३७ दिवसांचा संघर्ष संपला; मात्र ‘ही तर फक्त सुरुवात आहे’ या दीपके यांच्या विधानामुळे पुढचा संघर्ष नेमका कोणत्या दिशेने जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


