पंढरपूर प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला आज पहाटे पंढरपुरात भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पहाटे अडीच वाजता श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर श्री रुक्मिणी मातेचीही विधिवत पूजा करण्यात आली.
यंदाच्या शासकीय महापूजेत धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील शेतकरी दाम्पत्याला ‘मानाचा वारकरी’ म्हणून सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. बाळासाहेब माधव माने (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने हे या पूजेचे मानकरी ठरले. बाळासाहेब माने हे गेल्या २० वर्षांपासून आळंदी-पंढरपूर पायी वारी करीत आहेत. यंदाही ते पत्नीसह वारीत सहभागी झाले होते.
मध्यरात्री बारा वाजता दर्शनाची रांग बंद करण्यात आली, त्यावेळी रांगेत सर्वप्रथम असलेल्या बाळासाहेब माने यांची समितीने ‘मानाचा वारकरी’ म्हणून निवड केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाल्याने माने दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी दुपारीच पंढरपुरात दाखल झाले होते. पहाटे दोनच्या सुमारास ते पत्नी अमृता फडणवीस आणि कुटुंबीयांसह मंदिरात पोहोचले. त्यानंतर पहाटे अडीच वाजता त्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात आली. यंदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सहाव्यांदा आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे.
महापूजेपूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यात आली. श्री रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते, तर पाद्यपूजा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पार पडली.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह मंदिर प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
पंढरीत भक्तीचा महापूर
आषाढी यात्रेनिमित्त देशभरातून सुमारे ३० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर आणि प्रदक्षिणा मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
आषाढी एकादशीच्या पर्वकाळातील पवित्र स्नानासाठी चंद्रभागेच्या तीरावरही वैष्णवांची मोठी गर्दी झाली आहे. संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार आणि महाद्वार परिसरात भाविकांची मोठी रांग लागली आहे. नगरप्रदक्षिणेसाठी विविध दिंड्यांनी प्रदक्षिणा मार्गावर गर्दी केली आहे.
श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठीची रांग मंदिरापासून सुमारे २० किलोमीटरपर्यंत गेली असून, ८० हजारांहून अधिक भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांना सुमारे २४ ते २५ तास प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, कालपासून पावसाने उघडीप दिल्याने वारीसाठी आलेल्या लाखो भाविकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
महापूजेवेळीही मुखदर्शन सुरू
शासकीय महापूजेच्या कालावधीत सर्वसाधारणपणे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवण्यात येते. मात्र, यंदा प्रशासनाने महापूजेच्या वेळीही भाविकांसाठी मुखदर्शन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दूरदूरहून आलेल्या भाविकांना महापूजेच्या काळातही विठुरायाचे मुखदर्शन घेता आले.
दरम्यान, पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सुमारे तीन किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. मुखदर्शनासाठीही भाविकांची मोठी रांग लागली होती.
‘जन्माचे सार्थक झाले’
‘गेल्या २० वर्षांपासून मी आषाढीची वारी करीत आहे. एकदाही वारी चुकवली नाही. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्नीसमवेत शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक झाले. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाला डोळे भरून पाहता आले,’ अशी भावना मानाचे वारकरी बाळासाहेब माने यांनी व्यक्त केली.
‘पांडुरंगाने सर्वांना सुखी ठेवावे आणि राज्यात चांगला पाऊस पडावा,’ असे साकडेही त्यांनी विठुरायाच्या चरणी घातले.
पाच टन फुलांनी विठ्ठल मंदिराची सजावट
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला देशी-विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराचा गाभारा, सोळखांबी, चौखांबी, सभामंडप आणि संत नामदेव पायरी परिसर फुलांनी सजवण्यात आला आहे.
यंदा प्रथमच कमळाच्या फुलांसह सुमारे २५ ते ३० प्रकारच्या विविधरंगी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. जवळपास पाच टन फुलांनी मंदिर परिसर सजवण्यात आला असून, पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांच्या वतीने ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठल मंदिराचे रूप अधिकच खुलून दिसत असून, भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.


