नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर उपोषणाला बसलेले लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकार त्यांच्या भेटीसाठी जंतरमंतरवर पोहोचत आहेत.
In a democracy, peaceful protest is a constitutional right. When citizens undertake a fast to be heard, the duty of the government is to listen – not look away. That is Raj Dharma.
That is what Smt. Indira Gandhi Ji did in 1984. That is what Dr. Manmohan Singh's government did… pic.twitter.com/VpkN6HISHL
— Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) July 17, 2026
काँग्रेसचे राज्यसभा खासदार पवन खेडा यांनी गुरुवारी वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी, “असंवेदनशील सरकारसमोर स्वतःचा जीव धोक्यात घालून आंदोलन करू नका,” असे भावनिक आवाहन केले. काँग्रेस पक्ष आंदोलकांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना खेडा यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, उपोषणासारख्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने आंदोलकांशी संवाद साधणे ही त्यांची पहिली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्याचे केंद्र सरकार या आंदोलनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
इंदिरा गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करत खेडा म्हणाले, “पूर्वीच्या सरकारांनी आंदोलकांशी संवादाला नेहमीच प्राधान्य दिले. आज मात्र शैक्षणिक सुधारणांसारख्या गंभीर विषयावर चर्चा टाळली जात आहे. हा केवळ अहंकार नसून सरकारच्या असंवेदनशीलतेचा पुरावा आहे.”
दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही सामाजिक माध्यमांद्वारे वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहन सरकारला केले आहे.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही जंतरमंतरवर जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. आंदोलनस्थळी बोलताना त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धतीत तातडीने व्यापक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. “सोनम वांगचुक हे स्वतःच्या हितासाठी नव्हे, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष करत आहेत,” असे केजरीवाल यांनी सांगितले.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सरकारच्या भूमिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली असून, सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.


