नाशिक प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या धक्कादायक हल्ला, छेडछाड आणि तोडफोड प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत नऊ संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एका संशयिताचा भिवंडी-वाडा परिसरात शोध सुरू असून, आरोपींना आश्रय किंवा मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पर्यटकांना जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपींच्या टोळक्याने पर्यटकांच्या वाहनाचा तब्बल 15 ते 20 किलोमीटर पाठलाग केला. त्यानंतर रस्त्यात अडवून वाहनाच्या काचा फोडल्या, मारहाण केली आणि महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविणे आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ क्लिप आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींची ओळख पटवत त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर 2020 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहितीही डॉ. स्वामी यांनी दिली.
पोलीस तपासानुसार, सुरुवातीला धरण परिसरात एका व्यक्तीला शिट्टी वाजवण्यास सांगितल्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्यानंतर काही स्थानिकांनी पुन्हा पर्यटकांशी हुज्जत घातली. हा वाद पुढे वाढत जाऊन सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर रस्त्यात टोळक्याने पर्यटकांच्या वाहनावर हल्ला केला. वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या तसेच प्रवाशांना धमकावण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
डॉ. स्वामी यांनी स्पष्ट केले की, ज्या ठिकाणी सुरुवातीला वाद झाला त्या परिसरात पोलीस चौकी आणि बंदोबस्तही होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या 112 क्रमांकाच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकाने तक्रारदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यटक भीतीपोटी वेगाने पुढे निघून गेल्याने त्यांच्याशी तत्काळ संपर्क होऊ शकला नाही. अखेर पीडितांनी अंबड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
या घटनेनंतर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून अवघ्या काही तासांत आरोपींची ओळख पटवली आणि नऊ जणांना अटक केली. फरार आरोपीचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आरोपींना लपविणे, आश्रय देणे किंवा तपासात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. भावली धबधबा परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविण्यात आली आहे.
या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत असून, पर्यटनस्थळांवरील कायदा-सुव्यवस्था आणि पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


