नाशिक प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील पेठ-दिंडोरी सीमेवरील सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. घाटातील तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने मागून भरधाव ट्रकने इको कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार समोरील ट्रकवर आदळून दोन ट्रकांच्या कात्रीत सापडली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळा घाटातील उतारावरून इको कार जात असताना तिच्या मागून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने कारला मागून जोरदार धडक दिली. धडकेच्या जोरामुळे कार समोरून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या मागील भागावर आदळली. दोन अवजड वाहनांच्या मध्ये कार अडकल्याने तिचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.
या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा चारवर पोहोचला असून एका जखमीवर अद्याप उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर सावळा घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवून रस्ता मोकळा केला. काही तासांच्या प्रयत्नांनंतर घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
प्राथमिक तपासानुसार, ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


