मुंबई प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वादाला नवे वळण मिळाले असून, सूनेने केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपांनंतर आता राऊत यांनी प्रथमच माध्यमांसमोर भूमिका मांडली आहे. सूनेने केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचा दावा करत, घटस्फोटाच्या प्रकरणात मोठ्या आर्थिक मागण्या पूर्ण न झाल्यामुळेच ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीत विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात कौटुंबिक हिंसाचारासह विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या तक्रारीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
या पार्श्वभूमीवर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “माझ्यावर आणि कुटुंबीयांवर करण्यात आलेले सर्व आरोप वस्तुस्थितीपासून दूर आहेत. गितेश आणि गिरीजा गेली तीन वर्षे एकत्र राहत नाहीत. ज्या घटना २०१८ मधील असल्याचा दावा केला जात आहे, त्याबाबत तब्बल २०२६ मध्ये तक्रार करण्यात आली आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते.”
राऊत यांनी पुढे दावा केला की, सध्या न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असून, त्यामध्ये गिरीजा राऊत यांनी दरमहा पाच लाख रुपये पोटगी, १० कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम, मानसिक त्रासासाठी दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई, तीन खोल्यांचे घर आणि ऑटोमॅटिक कार अशी मागणी केली होती. या मागण्या मान्य न झाल्यानेच तक्रार दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कुटुंबावर करण्यात आलेल्या कथित अघोरी उपचारांच्या आरोपांचाही त्यांनी स्पष्ट शब्दांत इन्कार केला.
दरम्यान, गिरीजा राऊत यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत पती गितेश राऊत यांच्याविरोधातही वैवाहिक आयुष्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पतीने भारतात शारीरिक संबंध ठेवण्यास अस्वस्थता व्यक्त करत, केवळ परदेशात गेल्यानंतरच जवळीक साधण्याची इच्छा असल्याचे सांगितले. मुंबईतील तसेच मालवण येथील घरात कुटुंबीयांना आवाज जाईल, असे कारण देत जवळीक टाळल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे करण्यात आले असून, आरोपांची सत्यता अद्याप तपासाअंती स्पष्ट होणे बाकी आहे. कापूरबावडी पोलीस तक्रारीतील सर्व बाबींची पडताळणी करत असून, तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


