सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वर-पाचगणी पर्यटन पट्ट्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील २५ वर्षीय पर्यटकाची केवळ संशयाच्या आधारावर बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना पाचगणीजवळील भोसे येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत युवकाचे नाव अक्षय रमेश जाधव असे आहे. तो आपल्या पाच मित्रांसह पर्यटनासाठी पाचगणी-महाबळेश्वर परिसरात आला होता. बुधवारी रात्री ते भोसे गावातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षयने मद्याचे अतिसेवन केल्याने तो गोंधळ घालू नये म्हणून मित्रांनी त्याला खोलीत झोपवून बाहेरून कडी लावली होती. मात्र, तो खिडकीतून बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
रात्री सुमारे दहाच्या सुमारास मित्र खोलीत परतले असता अक्षय बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेत असताना हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर तो गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्याच्या आसपास काही स्थानिक नागरिकही उपस्थित होते.
प्राथमिक तपासात, मद्यधुंद अवस्थेतील अक्षय हा स्थानिक रहिवासी सूर्यकांत गोळे यांच्या घराच्या खिडकीतून आत डोकावत असल्याचा संशय निर्माण झाल्याचे समोर आले आहे. घरातील मुलीने वडिलांना फोन करून याची माहिती दिल्यानंतर सूर्यकांत गोळे यांनी काही साथीदारांसह घटनास्थळी धाव घेतली. संतप्त झालेल्या जमावाने अक्षयला पकडून चिखलात पाडले आणि लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या अक्षयला प्रथम पाचगणी, त्यानंतर वाई आणि पुढे बारामती येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी सूर्यकांत गोळे, अविनाश भोसले, राहुल राजपुरे आणि अमोल वाडकर यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील नेमके कारण, तसेच मारहाणीमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे पाचगणी-महाबळेश्वर या पर्यटनस्थळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संशयाच्या आधारावर कायदा हातात घेण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.


