नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात शनिवारी रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली. रात्रीचे जेवण केल्यानंतर अचानक 50 ते 60 विद्यार्थ्यांना उलट्या व अस्वस्थता जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी नंदुरबार व शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात सुमारे 217 विद्यार्थी वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे सात ते साडेसातच्या दरम्यान विद्यार्थ्यांना शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्यांचे जेवण देण्यात आले. जेवण सुरू असतानाच काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागली. काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने वसतिगृह प्रशासनाची धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर अवस्थेतील सहा विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी नंदुरबार येथील शासकीय तसेच शहरातील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता उपचार सुरू असून सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. आपल्या मुलांची अवस्था पाहून अनेक पालकांना अश्रू अनावर झाले. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय पथक तैनात केले.
दरम्यान, प्रांताधिकारी दीपक गिरासे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, नगरसेवक मुनेश जगदेव, संतोष वाल्हे, आमदारांचे स्वीय सहायक हेमराज पवार यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील, डॉ. राकेश पाटील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला.
या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर आरोप केले आहेत. वसतिगृहात सातत्याने निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून, याबाबत तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटी केली जाते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
या घटनेत देविदास बाशिंगे (रा. ओसर्ली), पार्थ धीवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज सिताराम कुवर, प्रदीप (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आणि मनोहर पानपाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अन्य विद्यार्थ्यांवर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, अन्नाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रशासनाने चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


