मुंबई प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे कोसळणे, फांद्या तुटणे आणि पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्कतेचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांनी झाडांचे वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट करावे, तसेच धोकादायक झाडे आणि फांद्यांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेताना शिंदे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक स्थानिक प्रशासनाने अतिरिक्त मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
झाडांचे केवळ छाटणीपुरते काम न करता त्यांच्या आरोग्याची, मुळांच्या स्थितीची आणि स्थैर्याची तज्ज्ञांकडून तपासणी करून वैज्ञानिक पद्धतीने ऑडिट करण्यात यावे, असा आग्रह शिंदे यांनी धरला. संभाव्य धोका ओळखून वेळेत उपाययोजना केल्यास अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. नागरिकांच्या जीविताशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद द्यावा, असे त्यांनी सांगितले.
पावसामुळे झाडे किंवा फांद्या कोसळून जखमी झालेल्या नागरिकांवर महापालिकांच्या माध्यमातून तातडीने आणि मोफत उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्य शासनाचे उद्दिष्ट ‘झिरो कॅज्युअल्टी’ असल्याचे अधोरेखित करत प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबतही प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे शिंदे यांनी सांगितले. वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य मूलभूत सुविधा सुरळीत उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
आळंदी परिसरातील वारकरी सुविधांच्या उभारणीसाठी आणि आवश्यक कामांसाठी तातडीने निधी मंजूर करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्सून काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, वेळेवर निर्णय घ्यावेत आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.


