मुंबई प्रतिनिधी
राज्यात ९ जुलै रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, राज्यातील कोणतीही शाळा बंद ठेवली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित सर्वोच्च मानत सर्व शाळांनी नियमितपणे सुरू राहावे, असे आदेश देण्यात आले असून, या निर्देशांचे उल्लंघन करून शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याच्या बातम्या विविध माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने परिस्थितीची दखल घेतली. त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना सविस्तर सूचना जारी केल्या आहेत.
या सूचनांमध्ये विद्यार्थ्यांचे कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक नुकसान होऊ नये, यावर विशेष भर देण्यात आला आहे. शाळांमधील अध्यापन नियमित सुरू राहील, याची खात्री करण्यासाठी स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष देखरेख ठेवावी, तसेच कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, शासनाच्या सूचनांचे पालन न करता आंदोलनाच्या कारणास्तव शाळा बंद ठेवणाऱ्या संस्थांवर आणि संबंधित जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेषतः उपस्थिती नोंदीच्या आधारे संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शिक्षक संघटनांकडून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवण्यात आली असली, तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, ही शासनाची प्राथमिकता असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
पालकांमध्ये शाळा सुरू राहणार की बंद, याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करत शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांनी नेहमीप्रमाणे नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे ९ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या स्पष्ट भूमिकेमुळे शाळा बंद आंदोलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने जिल्हानिहाय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


