मुंबई प्रतिनिधी
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका बुधवारी सलग चौथ्या दिवशी रेल्वे वाहतुकीला बसला. मध्य रेल्वेच्या नेरळ-भिवपुरी स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बदलापूर ते कर्जतदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. परिणामी कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूरसह परिसरातील हजारो प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे पश्चिम रेल्वेवरही वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असून सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
कर्जत परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा परिणाम नेरळ-भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर झाला आहे. रुळांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बदलापूर ते कर्जतदरम्यानची उपनगरी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. त्यामुळे बदलापूर, वांगणी, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली.
रेल्वे प्रशासनाने कर्जतकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवा थांबविल्या आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या गाड्या बदलापूर किंवा नेरळपर्यंतच चालवून तेथून परतीच्या फेऱ्यांसाठी रवाना केल्या जात आहेत. मात्र या गाड्याही विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचा खोळंबा वाढला आहे. पहाटे नेरळहून मुंबईकडे जाणारी ५.४० वाजताची एकच लोकल धावल्याची माहिती मिळाली.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काही धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. तरीही मध्य रेल्वेवरील अनेक गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असून काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. बदलापूर ते कर्जतदरम्यानची सेवा पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागणार, याबाबत अद्याप रेल्वे प्रशासनाने स्पष्ट माहिती दिलेली नाही.
दरम्यान, पश्चिम रेल्वेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. वसई, नालासोपारा आणि विरार परिसरात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने विरार-चर्चगेट मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक लोकल २० ते ३० मिनिटे विलंबाने धावत असून वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सकाळच्या कार्यालयीन गर्दीत मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नोकरदारांना याचा मोठा फटका बसला.
हार्बर मार्गावरील लोकल सेवाही सुमारे १५ मिनिटे विलंबाने सुरू असून मुसळधार पावसामुळे मुंबईच्या तिन्ही उपनगरी रेल्वे मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सलग चौथ्या दिवशी रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय झाली असून सेवा पूर्ववत होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


