मुंबई प्रतिनिधी
राज्यात जनतेच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या बेकायदा औषध व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत जून २०२६ महिन्यात राज्यभर विशेष तपास मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान ३४ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, तब्बल ४.१२ कोटी रुपयांची बेकायदा औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली.
राज्यात बेकायदा औषध उत्पादन, विनापरवाना विक्री, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाच्या औषधांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईत औषध कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली.
एफडीएच्या माहितीनुसार, विनापरवाना औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या १५ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २.३२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय, औषधांविषयी भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या आठ प्रकरणांमध्ये धाडी टाकून २.२७ लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली.
त्याचबरोबर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांवरील तीन कारवायांमध्ये ३३.२६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच वैद्यकीय उपकरण नियमांअंतर्गत १.२६ कोटी रुपयांच्या वैद्यकीय साहित्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.
७८७ नमुन्यांची तपासणी; ३५ निकृष्ट
जून महिन्यात एफडीएने राज्यभरातून ७८७ औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्यापैकी ७५२ नमुने निर्धारित गुणवत्तेनुसार योग्य आढळले, तर ३५ नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले.
निकृष्ट ठरलेल्या सर्व उत्पादनांच्या संबंधित बॅचची विक्री आणि वितरण तातडीने थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून, बाजारातून ती उत्पादने मागे घेण्याची (रिकॉल) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित उत्पादक, वितरक आणि परवानाधारकांविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
अनेक दैनंदिन वापरातील उत्पादने निकृष्ट
निकृष्ट आढळलेल्या उत्पादनांमध्ये सनस्क्रीन लोशन, कुमकुम, आयुर्वेदिक औषधे, पॅरासिटामोल, अँटिबायोटिक्स, अॅस्पिरिन, कफ सिरप, शॅम्पू आणि मेकअप फिक्सर स्प्रे यांसारख्या दैनंदिन वापरातील विविध उत्पादनांचा समावेश आहे. त्यामुळे औषधे किंवा सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना ग्राहकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि उत्पादनावरील तपशील तपासावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सहभागावर भर
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा औषध विक्रीबाबत तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी एफडीएने टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ उपलब्ध करून दिला असून, नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
मुंढे यांनी स्पष्ट केले की, जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. बेकायदा औषध उत्पादन, निकृष्ट दर्जाची औषधे आणि नियमबाह्य विक्रीविरोधातील धडक कारवाया पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.


