मुंबई प्रतिनिधी
चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आणखी एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. रस्ते व वाहतूक विभागातील एम/पश्चिम विभागाचे उपअभियंता अरुण मुंढे यांना निष्काळजीपणाचा ठपका ठेवत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, मुख्य अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंढे यांचे निलंबन कायम राहणार आहे. यापूर्वी उद्यान विभागातील सहाय्यक अधीक्षक जगदीश भोईर यांनाही याच प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत दोन अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी चेंबूरमध्ये रस्त्यालगतचे मोठे पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर कोसळले. या अपघातात ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर इतर काही विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर शहरभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, विरोधकांनीही प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. बैठकीपूर्वी सदस्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. सभागृहनेते गणेश खणकर यांनी तहकुबीचा प्रस्ताव मांडताना संबंधित विभागांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. कोसळलेल्या झाडाबाबत उद्यान विभागाने यापूर्वीच रस्ते विभागाला पत्राद्वारे सूचना दिल्याची बाबही चर्चेत आली.
दरम्यान, आयुक्तांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती केली असून, समितीला आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान तज्ज्ञांचा सल्ला घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत शिफारशी करण्यासही समितीला सांगण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात निष्काळजीपणा आढळलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू असून, संबंधित कंत्राटदाराविरोधातही योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


