नवी मुंबई प्रतिनिधी
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रशासकीय पातळीवर मोठी खांदेपालट करण्यात आली असून, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी शहरातील १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याबरोबरच पोलीस प्रशासनाला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बदल्यांमुळे पोलीस दलात मोठी चर्चा रंगली असून, संवेदनशील पोलीस ठाण्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम २२ न (२) अंतर्गत या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुक्त स्तरावरील मंजुरीनंतर तात्काळ अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले असून, संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित रुजू होऊन अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
या व्यापक फेरबदलामध्ये सानपाडा, खारघर, उरण, न्हावाशेवा, कामोठे, पनवेल शहर, रबाळे एमआयडीसी यांसारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील पोलीस ठाण्यांचा समावेश असल्याने या बदल्यांकडे विशेष लक्ष लागले आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
बदल्यानुसार खारघर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपाली राहुल पाटील यांची उरण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सायबर विमानतळ पोलीस ठाण्यात तात्पुरते संलग्न असलेले पोलीस निरीक्षक सुरज ज्ञानदेव पाटील यांच्याकडे आता खारघर पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे.
गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज अजितसिंह घोरपडे यांची न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ज्योती बाळासाहेब देशमुख यांच्याकडे कामोठे पोलीस ठाण्याचा, तर बाळा रघुनाथ कुंभार यांच्याकडे पनवेल शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
याशिवाय तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन शंकर कदम यांची गुन्हे शाखेच्या एएचटीयू (Anti Human Trafficking Unit) विभागात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील चेतनाराज चौधरी यांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील आनंदा वाघमारे यांची एनआरआय पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास प्रभाकर कठाळे यांची रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक विजय सुर्वे यांची सानपाडा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयातील या व्यापक फेरबदलामुळे शहरातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीत अधिक समन्वय, गतिमानता आणि प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने या बदल्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.


