सांगली प्रतिनिधी
‘मी सापाला धरायला गेलो आणि सापानेच मला धरलं…’ अशी शब्दांत आपल्या अंगावर काटा आणणाऱ्या अनुभवाचे वर्णन आमणापूर येथील वन्यजीव अभ्यासक व सर्पमित्र मोहसीन आदम सुतार यांनी केले. लोकवस्तीत आढळलेल्या एका मोठ्या धामण सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडत असताना या सापाने त्यांच्या दोन्ही हातांना इतका घट्ट विळखा घातला की काही काळ त्यांची सुटका करणेच अशक्य झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून वन्यजीवप्रेमींमध्ये त्याची मोठी चर्चा आहे.
मोहसीन सुतार यांनी लोकवस्तीत शिरलेल्या बिनविषारी धामण सापाला पकडून त्याला सुरक्षितपणे जंगल परिसरात सोडण्यासाठी नेले होते. मात्र, मुक्त करण्याच्या क्षणी सापाने अचानक त्यांच्या दोन्ही हातांभोवती स्वतःचे शरीर घट्ट गुंडाळले. सापाचा विळखा इतका मजबूत होता की पूर्ण ताकद लावूनही हात वेगळे करता येत नव्हते.
या अनुभवाविषयी सांगताना मोहसीन म्हणाले, “माणसाने दोरीला जो चावरफास म्हणजे घट्ट गाठ मारण्याचा प्रकार शोधला, तो बहुधा अशाच सापांच्या विळख्यावरून प्रेरित असावा. सापाने एवढा घट्ट विळखा घातला होता की रक्तपुरवठा थांबेल असे वाटू लागले. हातांच्या नसा फुगल्या होत्या. पूर्ण शक्ती लावूनही सुटका होत नव्हती. अशा वेळी घाबरण्यापेक्षा संयम राखणे महत्त्वाचे असते.”
सापाला कोणतीही इजा न पोहोचवता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी निसर्गाचाच आधार घेतला. त्यांनी आपले हात हळूहळू जमिनीच्या आणि झाडाझुडपांच्या दिशेने नेले. नैसर्गिक पृष्ठभागाचा स्पर्श होताच सापाने आपल्या सहज प्रवृत्तीनुसार हातावरील पकड सैल केली आणि जमिनीच्या दिशेने उतरू लागला. त्यानंतर मोहसीन यांनी शांतपणे स्वतःची सुटका करून घेत धामणला सुरक्षितपणे जंगलात मुक्त केले.
या घटनेतून वन्यजीव हाताळताना अनुभवाइतकाच संयम आणि सावधगिरीही महत्त्वाची असल्याचे अधोरेखित झाले आहे. धामण हा बिनविषारी साप असून उंदरांसारख्या पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांवर नियंत्रण ठेवत असल्याने त्याला ‘शेतकऱ्याचा मित्र’ मानले जाते. मात्र, तो बिनविषारी असला तरी स्वतःच्या संरक्षणासाठी शरीराचा शक्तिशाली विळखा घालू शकतो. त्यामुळे कोणत्याही सापाला हाताळण्याचा प्रयत्न सामान्य नागरिकांनी करू नये आणि अशा प्रसंगी प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही वन्यजीव अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.


