मुंबई प्रतिनिधी
माहिम रेल्वे स्थानकाबाहेर किरकोळ धक्काबुक्कीच्या वादातून ३५ वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
जखमी तरुणाचे नाव नवीन प्रसन्ना असून तो माहिम पश्चिमेतील पितांबर लेन परिसरात राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता नवीन लोअर परळ येथील कार्यालयातून घरी परतत होता. माहिम स्थानकाबाहेर जात असताना त्याचा एका अज्ञात व्यक्तीला धक्का लागला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने आपला मोबाइल खाली पडून तुटल्याचा दावा करत नवीनकडे नुकसानभरपाईची मागणी केली.
नवीनने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाले. आरोपीने धारदार शस्त्राने नवीनच्या पोटावर वार करून घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळलेल्या नवीनला नागरिकांच्या मदतीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नवीनचे भाऊ सचिन यांनी सांगितले की, नवीन लोअर परळ येथील जाहिरात, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कंपनीत कार्यालयीन कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. हल्ल्यानंतर तो सुमारे १५ तास बेशुद्ध अवस्थेत होता.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपी हल्ल्यानंतर रेल्वे मार्गाने पसार झाल्याचा संशय असून तो अंमली पदार्थांच्या व्यसनाधीन असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
अलीकडेच मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये २२ वर्षीय तरुणाच्या हत्येची घटना घडल्यानंतर आता माहिममधील या हल्ल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


