मुंबई प्रतिनिधी
सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या एका धक्कादायक व्हिडिओबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये एका लहान मुलीला एका महिलेकडून मारहाण करून पायाने ढकलल्याचे दिसत असून, ही महिला अंगणवाडी सेविका असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. मात्र, विभागाने केलेल्या चौकशीत हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या व्हिडिओमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हा प्रकार पनवेलमधील अंगणवाडीत घडल्याचा दावा करत अंगणवाडी व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काही ठिकाणी पालकांना आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत सावध राहण्याचे आवाहनही या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले होते.
मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने तातडीने चौकशीचे आदेश दिले. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांना घटनास्थळी पाठवून वस्तुस्थिती पडताळण्यात आली. या चौकशीत समोर आलेल्या निष्कर्षानुसार, व्हिडिओतील महिला अंगणवाडी सेविका नसून संबंधित चिमुकलीची स्वतःची आई असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत सोशल मीडियावर माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “संबंधित महिलेने आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच लहान मुलांना मारहाण करणे हा कायद्याने गुन्हा असल्याची जाणीव तिला करून देण्यात आली असून तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले आहे.”
तटकरे यांनी सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अप्रमाणित माहितीबाबतही चिंता व्यक्त केली. कोणतीही खातरजमा न करता अंगणवाडी सेविकांवर आरोप करण्यात आल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका लाखो बालकांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निःस्वार्थपणे काम करत आहेत. अशा परिस्थितीत चुकीची माहिती पसरवून त्यांच्यावर खोटे आरोप करणे अन्यायकारक असून समाजाने अशा अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावरील माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. संबंधित प्रकरणात विभागाने आवश्यक ती समुपदेशनाची प्रक्रिया सुरू केली असून बालकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा संदेशही प्रशासनाने दिला आहे.


