स्वप्नील गाडे
मुंबई : पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या (P.R.P.) मुंबई युवक कार्याध्यक्षपदी विश्वास जाधव यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे आणि महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप कवाडे यांच्या हस्ते नुकताच विश्वास जाधव यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे मुंबईत पक्षाच्या युवा संघटनेला मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विश्वास जाधव यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांचे संघटनकौशल्य लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवरून त्यांच्या खांद्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात युवक आघाडीचे नेतृत्व करताना, पक्ष संघटना अधिक मजबूत करणे आणि तळागाळातील तरुणांना पक्षाशी जोडणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे.
वरिष्ठ नेत्यांचे मानले आभार, समाजहिताचा केला संकल्प
आपल्या या निवडीबद्दल आणि सत्काराबद्दल भावना व्यक्त करताना नवनियुक्त मुंबई युवक कार्याध्यक्ष विश्वास जाधव म्हणाले,
“माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर,मा.जयदीप कवाडे आणि सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही केवळ एक पदवी नसून समाजकार्याची मोठी जबाबदारी आहे.”
ते पुढे म्हणाले की, आगामी काळात पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ध्येयधोरणे जनमानसात रुजवण्यासाठी आणि मुंबईतील युवकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि समाजहितासाठी अत्यंत जोमाने व निष्ठेने कार्य करण्याचा संकल्पही जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण
विश्वास जाधव यांच्या निवडीचे वृत्त समजताच पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः युवक आघाडीमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील विविध भागांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पक्षाची नवी घोडदौड सुरू होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


