मुंबई प्रतिनिधी
चार्टर्ड अकाउंटंट (सीए) इंटरमिजिएट परीक्षेच्या मे २०२६ सत्राचा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीचा रहिवासी असलेला शार्दुल शेखर विचारे याने ६०० पैकी तब्बल ५३१ गुण मिळवत (८८.५० टक्के) अखिल भारतीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, मुंबईच्या तीर्थ जैन याने ५१९ गुणांसह (८६.५० टक्के) देशात तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे देशातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत राज्याचा नावलौकिक वाढविला आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांनी सोमवारी हा निकाल जाहीर केला. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत यंदाही उत्तीर्णतेचे प्रमाण कमी राहिले. दोन्ही गटांची परीक्षा देणाऱ्या ३३ हजार ३०४ विद्यार्थ्यांपैकी केवळ २ हजार ८२० विद्यार्थी यशस्वी झाले असून एकूण उत्तीर्णतेचा टक्का ८.४७ इतकाच नोंदविला गेला.
कठीण परीक्षेत शार्दुलची दमदार कामगिरी
डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या शार्दुल विचारे याने सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या जोरावर हे यश मिळविले आहे. शार्दुलचे वडील शेखर विचारे आणि आई सीमा विचारे हे दोघेही वित्तीय सल्लागार (फायनान्स कन्सल्टंट) म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच घरातील वातावरणामुळे त्याला वाणिज्य आणि वित्तीय क्षेत्राची आवड निर्माण झाली.
शार्दुलने शालेय जीवनातही आपल्या बुद्धिमत्तेची छाप उमटवली होती. डोंबिवलीतील ओंकार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी असलेल्या शार्दुलने दहावीच्या आयसीएसई परीक्षेत ९९.०६ टक्के गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्या यशानंतर त्याने वाणिज्य शाखेची निवड केली आणि सध्या मुंबईतील पोद्दार महाविद्यालयात एस. वाय. बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे.
‘मला सुरुवातीपासूनच कॉमर्स क्षेत्राची विशेष आवड होती. आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेत मी सीए होण्याचे ध्येय निश्चित केले. इंटरमिजिएट परीक्षा हा एक महत्त्वाचा टप्पा होता. आता अंतिम सीए परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन व्यावसायिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे,’ असे शार्दुलने निकालानंतर सांगितले.
सातत्यपूर्ण मेहनत आणि कुटुंबाचा आधार
शार्दुलच्या यशामागे केवळ अभ्यासच नव्हे, तर कुटुंबाचा भक्कम पाठिंबाही महत्त्वाचा ठरल्याचे त्याच्या पालकांनी नमूद केले. ‘शार्दुल लहानपणापासून अभ्यासू आणि ध्येयवादी आहे. त्याने प्रत्येक टप्प्यावर मेहनतीवर विश्वास ठेवला. अंतिम सीए परीक्षेतही तो असेच यश संपादन करेल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे,’ असे त्याचे वडील शेखर विचारे यांनी सांगितले.
शार्दुलची मोठी बहीण शर्वरी विचारे सध्या बेंगळुरू येथे जैवतंत्रज्ञान विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे शिक्षण आणि संशोधनाची परंपरा असलेल्या या कुटुंबात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मुंबईच्या तीर्थ जैनचीही उल्लेखनीय झेप
मुंबईच्या तीर्थ जैन याने ५१९ गुण मिळवत देशात तिसरा क्रमांक पटकावला. सीएसारख्या आव्हानात्मक परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर अव्वल क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून त्यानेही महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे.
यंदाच्या परीक्षेत केरळमधील कोची येथील अभिनव सतीश याने ५३० गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे पहिल्या तीन क्रमांकांमध्ये महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांतील विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिले.
उत्तीर्णतेचा टक्का चिंताजनक
निकालाच्या आकडेवारीनुसार, गट-१ साठी ९१ हजार २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ९ हजार ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेचे प्रमाण १०.२५ टक्के राहिले. तर गट-२ मध्ये ६४ हजार ३८१ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ३७२ विद्यार्थ्यांनी यश मिळवत १६.११ टक्के निकाल नोंदविला.
सीए परीक्षा देशातील सर्वाधिक कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानली जाते. अशा परिस्थितीत डोंबिवलीच्या शार्दुल विचारेने अखिल भारतीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत केवळ ठाणे जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे. त्याच्या यशामुळे सीए होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.


