छत्तीसगड
छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात वाळू उत्खनन आणि वाहतूक व्यवसायावरील वर्चस्वाच्या संघर्षाने भीषण स्वरूप धारण करत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जनपद पंचायत अध्यक्ष भरत सिंह उर्फ लल्ला सिंह यांच्यासह तिघांचा जिवंत जाळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फॉर्च्युनर वाहनाच्या पुढे आणि मागे ट्रक उभे करून पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आणि त्यानंतर वाहनावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आल्याचा आरोप आहे. या निर्घृण हल्ल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवरील वाळू व्यवसायातील संघर्ष किती टोकाला गेला आहे, याचे भयावह चित्र समोर आले आहे.
मंगळवारी रात्री सोनहट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौगानी गावाजवळ ही घटना घडली. प्राथमिक तपासानुसार, भरत सिंह हे काही सहकाऱ्यांसह एका बैठकीसाठी गेले होते. वाळू उत्खननाशी संबंधित सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी ते चर्चेसाठी निघाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. मात्र, त्यांना सापळ्यात अडकवून नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
रस्त्यातच घात; सुटकेचे सर्व मार्ग बंद
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरत सिंह आणि त्यांचे सहकारी फॉर्च्युनरमधून प्रवास करत असताना आरोपींनी आधीपासूनच सापळा रचला होता. त्यांच्या वाहनाच्या पुढे आणि मागे दोन ट्रक उभे करण्यात आले. त्यामुळे वाहनाला पुढे किंवा मागे जाण्याचा कोणताही मार्ग उरला नाही. त्यानंतर वाहनावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आली.
आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. भरत सिंह यांच्यासह नागेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह हे गंभीररीत्या भाजले गेले. त्यापैकी तिघांचाही मृत्यू झाला. वीरेंद्र सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत मयंक सिंह हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर बिलासपूर येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनेक महिन्यांपासून सुरू होता संघर्ष
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, कोरिया जिल्ह्यातील सोनहट, कैलासपूर, तेलिमुडा, बेलिया आणि चिंगुरा परिसरात वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या नियंत्रणावरून गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू होता. या भागातील वाळू व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने विविध गटांमध्ये वर्चस्वासाठी चढाओढ वाढली होती.
भरत सिंह यांच्या कुटुंबाकडे काही वाळू घाटांचे कंत्राट असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, भाजप नेते मनोज त्रिपाठी यांच्या कुटुंबाशी संबंधित वाहतूक व्यवसाय आणि टिपर ट्रक नेटवर्क या परिसरात सक्रिय होते. वाळू वाहतुकीचे दर, महसूल वाटप आणि स्थानिक नियंत्रण यांवरून दोन्ही गटांमध्ये दीर्घकाळ तणाव होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, आर्थिक व्यवहार आणि व्यवसायावरील नियंत्रण या मुद्द्यांवरून निर्माण झालेला संघर्ष अखेरीस हिंसक स्वरूपात समोर आला.
चार आरोपी अटकेत; नऊ जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी वेगाने कारवाई करत अक्षत त्रिपाठी, विशाल त्रिपाठी, सत्यप्रकाश त्रिपाठी आणि मन्नू त्रिपाठी या चार आरोपींना अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू असून नऊ जणांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि कट रचल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
घटनास्थळावरील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची भूमिका निश्चित केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.
परिसरात तणाव; पोलिसांचा कडक बंदोबस्त
या घटनेनंतर कोरिया जिल्ह्यातील अनेक भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या हल्ल्याने राज्यातील बेकायदेशीर खाणकाम, वाळू माफियांचे जाळे आणि स्थानिक राजकारणातील आर्थिक हितसंबंध पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
मुख्यमंत्री साय यांची कठोर कारवाईची ग्वाही
या घटनेबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई. यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही आणि कठोर शिक्षा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्य सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देशही दिले आहेत.
राजकीय वैमनस्य, आर्थिक हितसंबंध आणि खाण व्यवसायावरील नियंत्रण यांचा संगम झाल्यास परिस्थिती किती भीषण होऊ शकते, याचे हे प्रकरण धक्कादायक उदाहरण मानले जात आहे. एका रात्रीत तीन जणांचा जीव घेणाऱ्या या हल्ल्यामुळे छत्तीसगडमध्ये कायदा-सुव्यवस्था आणि वाळू माफियांच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


