हिंगोली प्रतिनिधी
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी गुरुवारी हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही मतदान केंद्रांवर विक्रमी प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व १३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत शंभर टक्के मतदानाची नोंद केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींसाठी असलेल्या या निवडणुकीत मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे निवडणूक प्रक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद सदस्य अशा एकूण १३२ मतदारांसाठी वसमत, कळमनुरी आणि हिंगोली येथील तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्याच काही तासांत मतदारांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने केंद्रांवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कळमनुरीत सर्वप्रथम मतदान पूर्ण
कळमनुरी येथील मतदान केंद्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. येथे दुपारी बारा वाजेपर्यंतच शंभर टक्के मतदान पूर्ण झाले. या केंद्रावर १२ पुरुष आणि ११ महिला अशा एकूण २३ मतदारांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रियेतील ही वेगवान नोंद विशेष ठरली.
त्यानंतर वसमत आणि हिंगोली येथील मतदान केंद्रांवरही मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दुपारी साडेतीनपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण केली. वसमत केंद्रावर २५ पुरुष व २६ महिला अशा एकूण ५१ मतदारांनी मतदान केले, तर हिंगोली केंद्रावर २६ पुरुष आणि ३२ महिला अशा ५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रशासनाची काटेकोर व्यवस्था
मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली होती. तिन्ही मतदान केंद्रांवर आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी केंद्र परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.
तिरंगी लढतीकडे राज्याचे लक्ष
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सय्यद खान, महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख यांच्यात तिरंगी सामना रंगला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे मतदान निर्णायक ठरणार असल्याने या मतदारसंघातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून, अपक्ष उमेदवारानेही प्रचारादरम्यान प्रभावी उपस्थिती दर्शविल्याने निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
२२ जूनला मतमोजणी
मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून, परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेत कोणाची वर्णी लागणार, याचा फैसला त्या दिवशी होणार आहे. शंभर टक्के मतदानामुळे निकालाविषयीची उत्सुकता आणखी वाढली असून, सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचे दावे करण्यास सुरुवात केली आहे.


