नागपूर प्रतिनिधी
जयपूर येथे आंदोलनादरम्यान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नागपुरात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी दीपके यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. दुसरीकडे, आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागपूर पोलिसांनी तब्बल ७०० पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
जयपूरमधील घटनेनंतर नागपुरातील संविधान चौकात होणाऱ्या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक सहभागी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
समर्थकांची सरकारकडे मागणी
दीपके यांचे समर्थक आणि आंदोलन व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावणारे यश गौरखेडे यांनी जयपूरमधील हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. नागपुरातही काही समाजकंटकांकडून धमक्या देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त केली.
“अभिजित दीपके यांच्या जीवाला धोका असून सरकारने त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा उपलब्ध करून द्यावी,” अशी मागणी गौरखेडे यांनी केली. आमचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असून हिंसेशी आमचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी फुले आणि पुस्तके घेऊन यावे, असे आवाहनही केले.
दीपके यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप
नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिजित दीपके यांनी जयपूरमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर आरोप केला. “माझ्यावर हल्ला करणारे संघाचे लोक होते. सरकारविरोधात किंवा त्यांच्या विचारधारेविरोधात कोणी बोलले तर अशा प्रकारचे हल्ले केले जातात. मात्र अशा घटनांमुळे आम्ही घाबरणार नाही,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख केला. “आम्ही गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे आहोत. हा आमचा सत्याग्रह असून तो पूर्णपणे शांततेच्या मार्गानेच होईल,” असे दीपके यांनी स्पष्ट केले.
संविधान चौकात आंदोलन
मंगळवारी सायंकाळी चार वाजता नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात प्रबोधनकार आणि सुप्रसिद्ध खंजिरीवादक सत्यपाल महाराज सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यभरातील तसेच विदर्भातील विविध जिल्ह्यांतून कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने नागपुरात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलिसांचा कडक सुरक्षा आराखडा
जयपूरमधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी आंदोलनस्थळी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. संभाव्य विरोध, गर्दीचे व्यवस्थापन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.
बंदोबस्तासाठी चार पोलीस उपायुक्त, तीन सहाय्यक पोलीस आयुक्त, १८ पोलीस निरीक्षक, ४५ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासह ४७० पुरुष आणि १७० महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आंदोलनस्थळासह संवेदनशील परिसरांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
वाहतुकीत बदल
आंदोलनामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी काही मार्गांमध्ये बदल केले आहेत. संविधान चौक, व्हेरायटी चौक, झिरो माईल, सीताबर्डी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गांकडे वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सत्यपाल महाराजांची उपस्थिती
आंदोलनाला उपस्थित राहणार असल्याचे सत्यपाल महाराज यांनीही स्पष्ट केले आहे. रविवारी अभिजित दीपके यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. “मी या आंदोलनात सहभागी होणार आहे,” असे सत्यपाल महाराज यांनी सांगितले.
जयपूरमधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणात नागपुरातील हे आंदोलन शांततेत पार पडते की त्याला विरोधाचा सामना करावा लागतो, याकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच दीपके यांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या ‘झेड प्लस’ सुरक्षा मागणीवर शासनाची भूमिका काय राहते, याचीही उत्सुकता आहे.


