धाराशिव प्रतिनिधी
राज्यातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. विशेष न्यायालयाकडून सोमवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा असताना न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २० जून ही नवी तारीख निश्चित केली. त्यामुळे तब्बल दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या निंबाळकर आणि काझी कुटुंबीयांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची जून २००६ मध्ये मुंबईजवळील कळंबोली परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांवर कट रचून हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या दुहेरी हत्याकांडाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
‘न्यायव्यवस्थेवर विश्वास, दोषींना फाशी व्हावी’
निकालाच्या सुनावणीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना खासदार ओमराजे निंबाळकर भावूक झाले. “आयुष्यात ज्यासाठी संघर्ष केला, त्या लढ्याचा आज निर्णायक टप्पा आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच विश्वासाच्या बळावर आम्ही मागील २० वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करत आहोत,” असे ते म्हणाले.
“पवनराजे साहेबांच्या हत्येमुळेच मी राजकारणात आलो. राजकीय विरोधक संपवण्यासाठी सुनियोजित कट रचून ही हत्या करण्यात आली. न्यायालय दोषींना कठोर शिक्षा देईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, हीच माझी मागणी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘२० वर्षे १३ दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची’
निकालाच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी समाजमाध्यमांवरही भावना व्यक्त केल्या. “माझे वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे २० वर्षे झाली आहेत. अजूनही दोन्ही कुटुंबे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज न्यायदेवता न्याय करेल आणि रक्ताच्या नात्यालाही काळिमा फासणाऱ्यांचा फैसला होईल, अशी अपेक्षा होती,” असे त्यांनी म्हटले आहे.
या खटल्याचा उल्लेख करताना त्यांनी हा संघर्ष केवळ वैयक्तिक नसून सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा लढा असल्याचे नमूद केले. “लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत न मानणाऱ्या आणि रक्ताच्या नात्याचाही विश्वासघात करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध हा संघर्ष आहे,” असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.
निकालाकडे राज्याचे लक्ष
पवनराजे निंबाळकर हत्याकांड हे गेल्या दोन दशकांतील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गुन्हेगारी आणि राजकीय प्रकरणांपैकी एक मानले जाते. तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि विविध टप्प्यांवरील सुनावण्यांमुळे हा खटला दीर्घकाळ चर्चेत राहिला. त्यामुळे आता २० जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे निंबाळकर आणि काझी कुटुंबीयांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
न्यायालयाच्या निर्णयाने या बहुचर्चित प्रकरणाचा शेवटचा अध्याय लिहिला जाणार का, याची उत्सुकता आता आणखी चार दिवस वाढली आहे.


