मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून धमकीची पत्रे पाठवली जात असून या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी दाऊदी बोहरा समाजाच्या वारसा हक्काच्या वादावर एप्रिल २०२४ मध्ये दिलेला निर्णय सार्वजनिकरित्या मागे घ्यावा अशी मागणी धमकी देणाऱ्याने केली होती. तसे न केल्यास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गंभीर इजा पोहोचवण्याची चेतावणी देण्यात आली होती.
न्यायमूर्ती पटेल रविवारी लंडनहून मुंबईत परतल्यानंतर त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हेगारी धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या महिन्यात ५ जून रोजी न्यायमूर्ती पटेल यांच्या मुलीला आणखी एक धमकीचे पत्र मिळाले. यामध्ये यापूर्वी पुरेशी चेतावणी देण्यात आली असून आता एका टोळीची नियुक्ती करण्यात आली आहे आणि पुढचा टप्पा अंत्यसंस्कार असेल असा धक्कादायक इशारा देण्यात आला होता. या पत्रासोबत एक मेमरी कार्डही पाठवण्यात आले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव कुटुंबीयांनी ते उघडले नाही.
यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये काही व्यक्तींनी लंडनमधील न्यायमूर्ती पटेल यांच्या निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रारही देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांच्या मुलीला आणि जावयाला आणखी एक धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते.
धमकी देणाऱ्याने न्यायमूर्ती पटेल यांनी भारत सोडावा तसेच यूट्यूबवरील व्हिडिओंद्वारे स्वतःच्या निर्णयाचा जाहीर निषेध करावा अशी मागणी केली होती. याशिवाय विविध कायदेशीर संस्थांना मुलाखती देऊन स्वतःच्याच निर्णयाविरोधात न्यायालयात साक्ष द्यावी अशी अटही घालण्यात आली होती.
दरम्यान या वादाला कारणीभूत ठरलेला निर्णय दाऊदी बोहरा समाजाच्या आध्यात्मिक प्रमुखपदाच्या उत्तराधिकाराशी संबंधित आहे. न्यायमूर्ती पटेल यांनी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या उत्तराधिकाराला मान्यता दिली होती. या निर्णयाविरोधातील याचिका सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
याच वादाच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिल रोजी लंडनमध्ये एका मुखवटाधारी व्यक्तीने न्यायमूर्ती पटेल यांच्या मुलीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात तिचे नाक तुटले होते. एप्रिल २०२४ मध्ये निवृत्त झालेल्या न्यायमूर्ती गौतम पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.


