मुंबई प्रतिनिधी
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात यंदाच्या पावसाळ्यात ‘शून्य जिवीतहानी’ हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. यंदा मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाल्यामुळे प्रशासनाला तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला असून, या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावरही विशेष भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई आणि उपनगरांतील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत शिंदे बोलत होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, बेस्ट, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नालेसफाई, दरडप्रतिबंधक उपाययोजनांवर भर
पावसाळ्यातील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देताना शिंदे यांनी होल्डिंग पॉण्ड, फ्लड गेट्स आणि दरडप्रवण भागांमध्ये संरक्षण जाळी उभारण्याच्या कामांचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त केली. तसेच शहरातील मोठ्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
“प्रशासकीय यंत्रणांनी स्वतंत्र विभाग म्हणून नव्हे तर एक संघ म्हणून काम करणे आवश्यक आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कमीत कमी त्रास होईल, यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे नियोजन करावे,” असे शिंदे म्हणाले.
महापालिकेच्या स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दलाचा प्रस्ताव
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) धर्तीवर मुंबई महापालिकेने स्वतःचे विशेष आपत्ती प्रतिसाद पथक उभारण्याची गरजही शिंदे यांनी व्यक्त केली. आपत्तीच्या प्रसंगी त्वरित मदत आणि बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबविता यावे, यासाठी अशा पथकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे खड्ड्यांची समस्या कमी
मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा उल्लेख करताना शिंदे यांनी सांगितले की, शहरातील सुमारे २ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी १,७०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यावर होणाऱ्या खर्चात सुमारे ८० टक्के घट झाल्याचा दावा त्यांनी केला.
पर्यायी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आवश्यक
मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन बेस्ट आणि एसटी प्रशासनाने पर्यायी वाहतूक व्यवस्थेची पूर्वतयारी ठेवावी, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. तसेच झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ नये यासाठी महापालिकेने अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे प्रशासनालाही रेल्वे मार्गांखालील नाल्यांची नियमित आणि प्रभावी साफसफाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा रेल्वे परिसरातील पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीवर परिणाम होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
झोपडपट्टी भागांतील आरोग्यविषयक खबरदारी
झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये पाण्याचा योग्य निचरा झाल्यास जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे शिंदे यांनी नमूद केले. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेंतर्गत आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
याशिवाय मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासही त्यांनी सांगितले.
नौदल, एनडीआरएफशी सातत्यपूर्ण समन्वय
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये एनडीआरएफ, नौदल, वायुदल आणि लष्कराची महत्त्वपूर्ण मदत मिळत असल्याचे नमूद करत शिंदे यांनी संबंधित यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवण्याचे आवाहन केले. आपत्तीच्या काळात नागरिकांना त्वरित मदत मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
१२५ पर्जन्यमापक यंत्रे, ९३४ पंप सज्ज
बैठकीदरम्यान मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळी तयारीचा आढावा सादर केला. त्यांच्या माहितीनुसार, मुंबईत सध्या १२५ पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत असून जून ते सप्टेंबर या कालावधीत ४.५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भरतीचे २४ दिवस अपेक्षित आहेत.
शहरातील पाणी साचण्याच्या समस्या कमी करण्यासाठी ९३४ ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आले आहेत. तसेच ६५ मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत असून, यंदा प्रथमच ‘स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली’ सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून या यंत्रणेवर थेट देखरेख ठेवली जाणार आहे.
मुंबईत आपत्कालीन प्रतिसादासाठी एक हजार ‘आपदा मित्र’ स्वयंसेवक, एनडीआरएफची तीन पथके आणि नौदलाची नऊ पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहितीही बांगर यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारी केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात मुसळधार पावसाच्या काळात या उपाययोजनांची परिणामकारकता कितपत सिद्ध होते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


