मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, १८ जूननंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने १८ जून ते २ जुलै या कालावधीसाठी प्रसिद्ध केलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा ६ जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीच्या टप्प्यात वेगाने प्रगती करत हर्णे आणि सोलापूरपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे राज्याच्या उर्वरित भागातही मान्सून वेगाने पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची उत्तर सीमा स्थिर राहिल्याने त्याच्या प्रगतीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.
हवामान अभ्यासकांच्या मते, उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव सध्या मान्सूनच्या वाऱ्यांवर पडत आहे. परिणामी, मान्सूनची वाटचाल मंदावली असून राज्यातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी वादळी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी व्यापक स्वरूपातील मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही.
दरम्यान, शनिवारी मान्सूनने हैदराबाद परिसर, ओडिशाची किनारपट्टी तसेच पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांत पुढे सरकण्याची नोंद झाली. महाराष्ट्रात मात्र त्याची प्रगती मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.
दक्षिण कोकणावर सर्वाधिक प्रभाव
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ जून ते २ जुलै या कालावधीत मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव दक्षिण कोकण किनारपट्टीवर राहण्याची शक्यता आहे. प्रारंभीच्या टप्प्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण कोकणातील भागांत चांगल्या पावसाची नोंद होऊ शकते. त्यानंतर २५ जूननंतर मान्सूनची तीव्रता वाढत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर त्याचा प्रभाव विस्तारण्याचा अंदाज आहे.
याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांतही पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भावर सुरुवातीला मान्सूनचा प्रभाव तुलनेने कमी राहण्याचा अंदाज असला तरी जूनअखेरपर्यंत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची अपेक्षा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत वाढलेल्या उष्णता व दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मान्सून सक्रिय झाल्यास तापमानात घट होऊन उकाड्यापासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच खरीप हंगामाच्या पेरण्यांनाही वेग येण्याची शक्यता आहे.
एकूणच, पुढील चार ते पाच दिवस मान्सूनच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असून, १८ जूननंतर राज्यातील बहुतांश भागांत पावसाच्या हालचाली वाढण्याकडे हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.


