मुंबई, प्रतिनिधी
राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षाची सोमवार, १५ जूनपासून सुरुवात होत असून मुंबईतील शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शाळेत उत्साहपूर्ण स्वागत करण्यासाठी शिक्षक कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांचे नियोजन केले असून, शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत फुले, शुभेच्छा संदेश, शैक्षणिक साहित्य वितरण, मिठाई-चॉकलेट वाटप तसेच पर्यावरण जनजागृतीसाठी पदयात्रा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण आणि शिक्षणाबद्दल सकारात्मक भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मुंबई भाजपा अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी शिक्षक कार्यकर्ते शाळांमध्ये विशेष उपस्थित राहणार आहेत.
यासंदर्भात बोलताना आ. अमीत साटम यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांना योग्य प्रेरणा, सकारात्मक वातावरण आणि आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास ते भविष्यात जबाबदार व सक्षम नागरिक म्हणून घडू शकतात. प्रवेशोत्सवासारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आत्मीयता निर्माण करतात आणि शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ करतात,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शिक्षक नेते डॉ विशाल खांडे यांनीही या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. “प्रवेशोत्सव हा केवळ विद्यार्थ्यांच्या स्वागतापुरता मर्यादित नसून शिक्षणाविषयी आनंद, आत्मविश्वास आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारा उपक्रम आहे. आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबविणे शक्य झाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला पवन त्रिपाठी शिक्षण समिती अध्यक्षा राजश्री शिरवाडकर , नगरसेवक प्रतिक करपे
तसेच दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक परिणामकारक आणि संस्मरणीय प्रवेशोत्सव साजरा होणार असल्याचा विश्वास शिक्षक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे आनंददायी स्वागत करून शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून, मुंबईतील विविध शाळांमध्ये सोमवारी उत्साह, आनंद आणि कृतज्ञतेच्या वातावरणात प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.


