मुंबई, प्रतिनिधी
मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे आणि रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय यांचा विचार करून रेल्वे, मुंबई महापालिका, बेस्ट, मेट्रो, जिल्हाधिकारी कार्यालये आणि अन्य संबंधित प्राधिकरणांनी एकत्रितपणे सर्वसमावेशक आपत्कालीन आराखडा तयार करावा, अशा सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिल्या. विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील रेल्वे हद्दीतील नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मीणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग, मुंबई शहर व उपनगरचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे, अग्निशमन दल आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पूरस्थितीत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
मुंबईत अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत गर्दीचे व्यवस्थापन, प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढणे, स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी कमी करणे, तसेच अन्न व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे यासाठी पूर्वनियोजन आवश्यक असल्याचे शेलार यांनी नमूद केले.
यासोबतच रेल्वे आणि महापालिकेच्या नियंत्रण कक्षांमध्ये तातडीचा संपर्क राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, सूचना प्रसारण व्यवस्था आणि आपत्कालीन नियंत्रण कक्ष यांचा परस्पर समन्वय वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पूल, होर्डिंग्जच्या संरचनात्मक सुरक्षिततेवर भर
मान्सूनदरम्यान दुर्घटनांचा धोका टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांतील व स्थानकाबाहेरील पादचारी पूल, वाहतूक पूल तसेच परिसरातील होर्डिंग्ज यांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. याशिवाय रेल्वे आणि महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या पाणी उपसा यंत्रणा आणि पंपांचा एकत्रित वापर करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यावरही भर देण्यात आला.
मस्जिद बंदर परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न
मस्जिद बंदर परिसरातील रेल्वे हद्दीत असलेल्या धोकादायक २४ इमारती आणि काही झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही बैठकीत चर्चिला गेला. या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पश्चिम रेल्वेकडून निचऱ्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत
पश्चिम रेल्वे प्रशासनाने सादरीकरणादरम्यान चर्चगेट ते विरार मार्गावरील पाणी साचण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्याची माहिती दिली. या मार्गावर रेल्वे रुळांखालून एकूण १५ मायक्रो टनेल तयार करण्यात आले असून त्यापैकी चार टनेल यावर्षी पूर्ण करण्यात आले आहेत. पावसाचे पाणी जलदगतीने बाहेर काढण्यासाठी १२६ पंप कार्यान्वित करण्यात आले असून नाले व जलवाहिन्यांमधून सुमारे २,४०० वॅगन गाळ काढण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले.
मध्य रेल्वेकडूनही व्यापक उपाययोजना
मध्य रेल्वेनेही मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सादर केला. ३५० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील १६० नाले व गटारांची साफसफाई पूर्ण करण्यात आली असून पाणी उपसण्यासाठी २२० पंप बसविण्यात आले आहेत. विविध संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पर्जन्यमापक यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
कांजूरमार्ग येथील उषानगर नाला आणि कुर्ला येथील ब्राह्मणवाडी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण झाल्याने यंदा पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली.
यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी
बैठकीत मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलानेही काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी विविध यंत्रणांमधील समन्वय गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक सक्षम झाला असून याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत दरवर्षी अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा अनुभव लक्षात घेता यंदा रेल्वे, महापालिका आणि अन्य यंत्रणांनी पूर्वतयारीवर विशेष भर दिला आहे. मात्र या उपाययोजनांची प्रत्यक्ष परिणामकारकता मान्सूनच्या जोरदार सरी सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


