ठाणे प्रतिनिधी
पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी २८ जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील पाच वर्षांखालील सुमारे १ लाख ९७ हजार ६९४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी १ हजार ८७८ लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी संयुक्त नियोजन केले आहे. लसीकरण बूथवर ४ हजार ३४८ कर्मचारी कार्यरत राहणार असून ३७४ पर्यवेक्षकांकडून देखरेख केली जाणार आहे.
एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष घरभेट मोहिमेचेही नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ६९ हजार ७७३ घरांना भेटी देण्यासाठी १ हजार ३४७ पथके कार्यरत राहतील. या मोहिमेसाठी ५ हजार ३२३ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले असून २६३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके तसेच स्थलांतरित नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अशा ठिकाणी ६८ ट्रान्झिट पथके तैनात करण्यात येणार असून त्यांच्यावर २७ पर्यवेक्षक देखरेख ठेवतील. दुर्गम भागांतील बालकांपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी ८८ मोबाईल पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील ३६ आरोग्य संस्था सहभागी होणार असून ७६ वैद्यकीय अधिकारी आणि ३४ जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवणार आहेत. लसींची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी ४ हजार २२५ कोल्ड चेन उपकरणे, १ हजार २९२ लस वाहक आणि ४ हजार ४७६ मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे आवाहन केले आहे. तसेच घरभेटीदरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पोलिओमुक्त भारताचे यश टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


