नाशिक प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी गावच्या कन्या उत्कर्षा शशिकांत जाधव हिने महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. नाशिक येथील त्र्यंबकरोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर पार पडलेल्या १२७ व्या प्रशिक्षण तुकडीच्या दीक्षांत समारंभात उत्कर्षा जाधव हिने सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सर्वोच्च मान पटकावत प्रतिष्ठेची ‘मानाची रिव्हॉल्व्हर’ आपल्या नावावर केली.
राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते उत्कर्षा जाधव यांना मानाची रिव्हॉल्व्हर, चषक आणि गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. या यशामुळे सातारा जिल्ह्यासह दहिवडी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जाधव कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तीन मानाचे किताब एकाच वेळी
प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट शारीरिक क्षमता, नेतृत्वगुण, शिस्त, कायदेविषयक ज्ञान आणि सर्वांगीण कामगिरीच्या जोरावर उत्कर्षा जाधव यांनी एकाच वेळी अनेक मानाचे पुरस्कार पटकावले. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आली. याशिवाय ‘कै. यशवंतराव चव्हाण सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर चषक’ आणि ‘अहिल्याबाई होळकर सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी चषक’ यांच्याही त्या मानकरी ठरल्या.
पोलिस अकादमीच्या इतिहासात महिला प्रशिक्षणार्थींनी उल्लेखनीय कामगिरी करून सर्वोच्च सन्मान पटकावण्याच्या घटनांमध्ये उत्कर्षा जाधव यांच्या नावाची भर पडली आहे.
पोलिस सेवेचा वारसा; कन्येने उंचावला मान
उत्कर्षा जाधव यांचे यश हे केवळ वैयक्तिक यश नसून पोलिस सेवेशी निगडित असलेल्या त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेलाही साजेसे ठरले आहे. त्यांचे वडील शशिकांत जाधव यांनी दीर्घकाळ पोलिस सेवेत कार्यरत राहून नुकतीच एसआरपीएफच्या दौंड येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्ती स्वीकारली आहे. तर त्यांचा भाऊ सध्या मुंबई पोलिस दलात कार्यरत असून कुटुंबातील तिसऱ्या सदस्यानेही आता पोलिस सेवेत उल्लेखनीय ठसा उमटवला आहे.
कठोर प्रशिक्षणातून घडलेले यश
महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना शारीरिक तंदुरुस्ती, शस्त्र हाताळणी, कायदे, गुन्हे अन्वेषण, नेतृत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षा अशा विविध विषयांवर कठोर प्रशिक्षण दिले जाते. या सर्व क्षेत्रांत सातत्यपूर्ण उत्कृष्टता राखत उत्कर्षा जाधव यांनी तुकडीतील अव्वल स्थान मिळवले.
दहिवडीसह सातारा जिल्ह्याचा अभिमान
ग्रामीण भागातून पुढे येत राज्यस्तरावर सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या उत्कर्षा जाधव यांच्या यशामुळे दहिवडी आणि सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे पोलिस सेवेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक तरुण-तरुणींना नवी प्रेरणा मिळाली आहे.
उत्कर्षा जाधव यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, आगामी काळात त्या महाराष्ट्र पोलिस दलात कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर अधिकारी म्हणून कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


