रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हमरापूर परिसरातील शितोळेवाडी हद्दीत अर्धनग्न अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या खुनाचा अवघ्या 24 तासांत उलगडा करण्यात पेण पोलिसांना मोठे यश आले आहे. जुन्या ओळखीतील दोन मित्रांनीच विकृत हेतूने महिलेची हत्या केल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मोबाईल फोनच्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना गजाआड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आल्या होत्या. त्या पतीपासून विभक्त राहत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी बाजार परिसरात त्यांची जुन्या ओळखीतील रामअवतार उर्फ शेरा रामविश्वास केवट आणि सुनील मोतीलाल विश्वकर्मा यांच्याशी भेट झाली होती. अनेक वर्षांच्या परिचयामुळे तिघेही एकत्र वेळ घालवण्यासाठी गेले होते.
दरम्यान, दोन्ही आरोपींनी मद्यपान केले होते. त्यानंतर त्यांनी महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केली. मात्र महिलेने त्यास स्पष्ट नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तिच्यावर क्रूर हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी प्रथम तिच्या चेहऱ्यावर मारहाण केली आणि त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली.
पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न
हत्या केल्यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह शितोळेवाडी परिसरातील झाडाझुडपात फेकून दिला. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
मोबाईल ठरला तपासातील महत्त्वाचा दुवा
पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 123/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) आणि 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी मृत महिलेच्या संपर्कातील मोबाईल क्रमांकांची आणि कॉल डिटेल्सची बारकाईने छाननी केली. त्यातून काही संशयित व्यक्तींची माहिती समोर आली. या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी रामअवतार उर्फ शेरा रामविश्वास केवट याचा शोध घेतला. तो पेण तालुक्यातील एका क्रशरवर काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत कबुली; साथीदाराचाही पर्दाफाश
रामअवतार याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच सुनील मोतीलाल विश्वकर्मा याच्या मदतीने हा खून केल्याची माहितीही पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली. दोन्ही आरोपींना 9 जून रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
या प्रकरणाचा अवघ्या एका दिवसात उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत कमी कालावधीत गंभीर गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात आल्याने पेण पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
दरम्यान, या हत्येमागे आणखी कोणते कारण होते का, तसेच आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


