जळगाव प्रतिनिधी
अमळनेर-धुळे महामार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात सकाळी सुमारे सातच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरकडून धुळ्याकडे जाणारी एसटी बस, एक कार आणि दुचाकी मार्गस्थ असताना समोरून येणाऱ्या गुजरात नोंदणीच्या कारने नियंत्रण गमावून या तिन्ही वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर दुचाकीचा चेंदामेंदा झाला.
या अपघातात दुचाकीस्वारासह कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि पुरुषांचा समावेश असून मृतांची संख्या सहा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातात काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी सर्वप्रथम मदतकार्यात सहभाग घेतला. त्यानंतर पोलीस, एसटी कर्मचारी आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तसेच इतर जखमींनाही तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमींना गुजरातमधील व्यारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी परिसराचा ताबा घेत पंचनामा सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, एका क्षणात सहा जणांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जळगाव जिल्ह्यात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

