मुंबई प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांनी १६.२४ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई महापालिकेचे (बीएमसी) सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी महेश पाटील यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खार पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडे वर्ग करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी वांद्रे येथील एका पुनर्विकास प्रकल्पात मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत हबीबा जाफरी यांच्याकडून १६.२४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, या व्यवहारासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. प्रकल्प सरकारी स्तरावर मंजूर असून गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास देण्यात आला होता. मात्र, गुंतवणुकीनंतर ना अपेक्षित परतावा मिळाला, ना प्रकल्पातून कोणताही लाभ झाला. त्यामुळे फसवणूक झाल्याचा संशय आल्याने जाफरी कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर महेश पाटील फरार झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची विविध पथके मुंबईसह अन्य ठिकाणी छापेमारी करत आहेत. या प्रकरणात उद्योगपती निशित पटेल यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घडामोडीनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने महेश पाटील यांना निलंबित केले. निलंबनाचा अधिकृत आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला असून तो रविवारी त्यांना बजावण्यात आल्याचे समजते.
काय आहे प्रकरण?
हबीबा जाफरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वांद्रे पश्चिम येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करण्यात आले. महेश पाटील यांनी स्वतः या प्रकल्पाची माहिती देत सर्व परवानग्या पूर्ण झाल्याचा विश्वास दिल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी सरकारी नोंदणीची कागदपत्रे दाखवत हा प्रकल्प सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर धनादेश, रोख रक्कम, विदेशी चलन आणि महागड्या घड्याळांच्या स्वरूपात १६ कोटींपेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यात आली. मात्र पैसे घेतल्यानंतर ना घरे मिळाली, ना गुंतवणूक परत मिळाली. त्यामुळे अखेर जाफरी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


