मुंबई प्रतिनिधी
राज्यात मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले. सातारा, पुणे, जळगाव आणि परभणी जिल्ह्यांसह विविध भागांत शनिवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला, तर शेती पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेषतः बारामती तालुक्यातील केळीच्या बागा आणि महाबळेश्वर-जावळी परिसरातील स्ट्रॉबेरी व टोमॅटो पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यात दुपारनंतर अचानक हवामानात बदल झाला आणि काही मिनिटांतच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले. वाई तालुक्यातील भुईंज, जोशीविहीर परिसरात पावसाचा जोर इतका होता की पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ संथ झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडांच्या फांद्या कोसळल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
महामार्गावर पाणी साचल्याने कार अडकली
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कार पाण्यात अडकून पडली. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जीप आणि पिकअप वाहनांच्या साहाय्याने कार सुरक्षित बाहेर काढली. या घटनेमुळे महामार्गावरील अपुऱ्या जलनिचरा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावरच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांनी प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली आहे.
महाबळेश्वर-जावळीतील फळबागांना फटका
सातारा जिल्ह्यातील जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच लागवड करण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट्सवर पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला असून टोमॅटो पिकांचेही नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाला मिळाली आहे. सध्या बाजारात टोमॅटोला समाधानकारक दर मिळत असताना या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शिवथर परिसरात मुसळधार पावसासह आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे विजेचा खांब कोसळला. त्यामुळे संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना अनेक तास अंधारात राहावे लागले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बारामतीत केळीच्या बागा जमीनदोस्त
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर पाहायला मिळाला. अनेक भागांतील केळीच्या बागा वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाल्या. फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या केळीच्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील काऱ्हाटी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जळगावात टोल नाक्याचे पत्रे उडाले
जळगाव जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाक्याचे पत्रे उडून कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टोल नाक्याच्या एका बाजूची संरचना नुकसानग्रस्त झाल्याने दोन लेन तात्पुरत्या बंद ठेवाव्या लागल्या. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
परभणीत झाडे उन्मळून पडली, मार्ग बंद
परभणी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. पूर्णा तालुक्यातील पूर्णा झिरो फाटा मार्गावर मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
माटेगाव ते लक्ष्मणनगर पाटी या मार्गावरही चक्रीवादळासारख्या तीव्र वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. परिणामी हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. स्थानिक नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वादळी हवामानाचा वाढता प्रभाव जाणवत असल्याचे सांगितले.
प्रशासन सतर्क, पंचनाम्यांना सुरुवात
राज्यातील विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती, वाहतूक आणि वीजपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कृषी विभाग, महसूल यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्याचे काम सुरू असून प्राथमिक पंचनाम्यांनंतर नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मान्सूनच्या आगमनाच्या उंबरठ्यावरच निसर्गाने दाखविलेल्या या रौद्ररूपामुळे शेतकरी वर्गासमोर नव्या आव्हानांची मालिका उभी राहिली आहे.


