मुंबई प्रतिनिधी
मुंबई : शहरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने रविवारी विविध भागांत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाया केल्या. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्पासाठी मुलुंडमधील अमरनगर-खिंडीपाडा परिसरातील १५० निवासी व व्यावसायिक अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली, तर दादर पूर्वेत सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी २७ अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. याशिवाय, जुहू येथील सुमारे ८० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या १२.२० किलोमीटर लांबीच्या जीएमएलआर प्रकल्पासाठी मुलुंडमधील अमरनगर व खिंडीपाडा परिसरातील एकूण ३८४ बांधकामे अडथळा ठरत होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून उर्वरित २३४ बांधकामे पुढील आठवड्यात हटविण्यात येणार आहेत. पात्र कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण केल्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
‘टी’ विभागाच्या सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जेसीबी, पोकलेन आणि डम्परसह मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुलुंड पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
दरम्यान, उपनगर जिल्हा प्रशासनाने जुहू परिसरातील शासकीय जमिनीवरील सुमारे ७० अनधिकृत झोपड्या व बांधकामे हटवून आठ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची जमीन ताब्यात घेतली. या जमिनीचे बाजारमूल्य सुमारे ८० कोटी रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून येथे संरक्षक भिंत उभारण्याची तयारी सुरू आहे.
दुसरीकडे, सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दादर पूर्व परिसरातील रेल्वेच्या जागेवरील २७ पक्की अतिक्रमणे हटविण्यात आली. रेल्वे, आरपीएफ, जीआरपी आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ही मोहीम शांततेत पार पडली.
प्रकल्पांना मिळणार गती
• जीएमएलआर पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव ते मुलुंड प्रवास १५ ते २० मिनिटांत होणार.
• सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा रेल्वेमार्ग प्रकल्पामुळे उपनगरी रेल्वे सेवेची क्षमता वाढणार.
• जुहूतील अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा होणार.


