सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील पलूस येथील एका विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. लग्नानंतर सतत हुंड्याची मागणी, “वंशाला मुलगा हवा” या कारणावरून मानसिक आणि शारीरिक छळ, तसेच जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत विवाहितेचा मृतदेह गेल्या चार दिवसांपासून पलूस ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत.
मृत विवाहितेचे नाव आरती प्रशांत जाधव (वय ३७) असे असून तिचा मृत्यू तामिळनाडू राज्यातील नागपट्टीनम येथे झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पतीसह सहाजणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पलूस परिसरात संताप व्यक्त केला जात असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मृत्यूची माहिती लपवण्याचा प्रयत्न?
आरतीच्या माहेरच्यांच्या आरोपानुसार, शनिवारी सकाळी तिच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना थेट देण्याऐवजी सासरच्यांनी स्थानिक सुवर्णकारांशी संपर्क साधून परस्पर शवविच्छेदन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण घटनेबाबत संशय अधिक गडद झाला. आरतीचा भाऊ आणि नातेवाईकांनी पती प्रशांत जाधव, सासू, नणंद आणि इतर नातेवाईकांनी मिळून तिचा छळ करून जीव घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे.
“मुलगा नाही” म्हणून अमानुष छळ
२०११ मध्ये आरतीचा विवाह नागपट्टीनम येथील सुवर्ण व्यवसायिक प्रशांत आनंदराव जाधव याच्याशी झाला होता. विवाहानंतर तिला दोन मुली झाल्या. मात्र “वंशाला दिवा हवा” या कारणावरून तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
नातेवाईकांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी पुन्हा गर्भधारणा झाल्यास आरतीच्या जीवाला धोका असल्याचा स्पष्ट इशारा दिला होता. तरीदेखील मुलासाठी तिच्यावर दबाव आणण्यात आला. इतकेच नव्हे तर, तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
५० तोळे सोन्याची मागणी
आरतीच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर सासरकडून तब्बल ५० तोळे सोन्याची मागणी करण्यात आली होती. उर्वरित सोने माहेरहून आणण्यासाठी तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात होता. गेल्या सहा वर्षांपासून तिला माहेरच्यांशी संपर्कही करू दिला जात नसल्याचा धक्कादायक आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी आरतीचे वडील सुभाष बळवंत कदम (वय ७४) यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, फेब्रुवारी २०१५ ते २३ मे २०२६ या कालावधीत आरतीचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला.
मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, “तुला मुलगा होत नाही” तसेच “माहेरहून सोने आण” या कारणांवरून आरोपींकडून वारंवार टोमणे मारणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे आणि मारहाण करण्यात येत होती. विशेषतः पती प्रशांत जाधव आणि सासू रूपा जाधव यांनी प्रत्यक्ष हाताने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सततच्या छळामुळे आरती मानसिकदृष्ट्या खचली होती आणि या छळातूनच तिचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सहाजणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी प्रशांत आनंदराव जाधव, रूपा आनंदराव जाधव, संध्या प्रकाश साळुंखे, प्रकाश जोतिराम साळुंखे, प्रतिक प्रकाश साळुंखे आणि शेजल प्रकाश साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा तामिळनाडूतील नागपट्टीनम येथे घडल्याने पुढील तपास नागपट्टीनम सिटी पोलिसांकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भाषेची अडचण आणि स्थानिक प्रक्रियेमुळे तक्रार नोंदवण्यात अडथळे येत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार पलूस पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला.
अद्याप अटक नाही
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र संशयास्पद मृत्यू, हुंडाबळी आणि मुलासाठीच्या छळाच्या आरोपांमुळे या घटनेने सामाजिक संताप उसळला असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पलूस परिसरात आरतीला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी होत आहे.


